पीटीआय, अमरावती (आंध्र प्रदेश) : देशातील उच्च शिक्षण संस्थांची सामाजिक नाळ तुटत चालली असून भूछत्रांप्रमाणे हे शिक्षणाचे कारखाने पसरत चालले आहेत, अशी टीका सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शनिवारी येथे केली.
वास्तव जीवनाला सामोरे जाताना येणारी आव्हाने कशी पेलावीत, हे शिकविणारी शिक्षण पद्धती विकसित केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ही नवी शिक्षण पद्धती ही त्या विद्यार्थ्यांला समाजाचा जबाबदार घटक बनविण्याबरोबरच सामाजिक एकता साधणारी असली पाहिजे, असे ते म्हणाले.
आचार्य नागार्जून विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याच समारंभात रमणा यांनी या विद्यापीठातर्फे सन्माननीय डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. न्या. रमणा पुढे म्हणाले की, युवक हा सजगपणे बदल घडविणारा असला पाहिजे. त्यांनी शाश्वत विकासाच्या प्रारूपावर विचार केला पाहिजे. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहून तुम्ही सजगपणे समाज आणि पर्यावरण यांच्या गरजांची दखल घेतली पाहिजे.