पीएचडीपासून ते अभियांत्रिकीचे शिक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात उफाळलेल्या स्थानिक दहशतवादात सामील झालेल्यांमध्ये १५ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांपासून डॉक्टरेट मिळवलेल्या तरुणाचा समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे.

सुरक्षा यंत्रणांनी गोळा केलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात वानी एका चकमकीत ठार झाल्यानंतर ६७ स्थानिक युवक दहशतवादात सामील झाले आहेत. त्यापैकी ५० वाणीच्या कार्यक्षेत्रातील, म्हणजे दक्षिण काश्मीरचे आहेत. ६३ जण वयाने तीस वर्षांहून कमी असून त्यात १६ व १५ वर्षे वयाच्या दोन मुलांचा समावेश आहे. तर केवळ तिघे तुरुंगवास भोगल्यानंतर पुन्हा दहशतवादाकडे वळलेले आहेत.

दक्षिण काश्मिरातील नऊ जण पुलवामा जिल्ह्य़ातील, नऊ अवंतीपोरातील, १३ कुलगाम जिल्ह्य़ातील, ११ शोपियाँ जिल्ह्य़ातील, तर आठ जण अनंतनागमधील आहेत. उत्तर काश्मीरचे आठ जण नव्याने दहशतवादी बनले असून त्यापैकी दोन कुपवाडातील, एक हंदडवाडातील, तीन बंदीपोरातील आणि दोघे सोपोरचे आहेत. मध्य काश्मिरातील तरुणांपैकी तीन बडगामचे, तर दोघे श्रीनगरचे असल्याचे या माहितीवरून उघड झाले आहे.

आठ जण पदवी अभ्यासक्रमात शिकत होते. दहा जणांनी बारावी आणि १२ जणांनी दहावी उत्तीर्ण केली असून एका इमामसह तिघेजण मदरशाचे विद्यार्थी होते. इतर माध्यमिक शाळेपर्यंत शिकले आहेत.

  • दहशतवाद्यांपैकी एक पीएच.डी.धारक, एक एम.फिल. आणि दोन पदव्युत्तरांसह सहा जण पदवीधारक आहेत.
  • पाच जण अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रमात शिकत होते, दोघे जण बी.टेक. व एक जण बी.ई. (संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाला होते,
  • एक जण तंत्रनिकेतनचा, तर एक जण संगणकशास्त्रातील पदविका अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता.