कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास मनाई केली आहे. यावेली कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाने (CFI) हिजाब आणि भगव्याची तुलना होऊच शकत नाही, असं म्हटलंय. दरम्यान, हिजाब बंदी प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश अस्वस्थ करणारा असल्याचं म्हणत, विद्यार्थ्यांच्या संघटनेने असा आरोप केला की उजव्या विचारसरणीच्या संघटना अशांतता आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करत आहेत.
“हिजाब हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार आहे, हिजाब आणि भगव्या शालीची तुलना होऊ शकत नाही. हिजाबच्या विरोधात वाद निर्माण करण्यासाठी ABVP आणि भाजपाच्या संयुक्त रणनीतीचा एक भाग म्हणून, विद्यार्थी भगवी शाल घालू लागतात आणि राज्यभर हिंसाचाराद्वारे जातीय द्वेष पसरवतात,” असं CFI कर्नाटकचे अध्यक्ष अथाउल्ला पुंजलकट्टे म्हणाले.
Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी!
पुंजलकट्टे यांनी दावा केला की भगवी शाल परिधान केलेल्या आंदोलकांनी हिजाब प्रकरणाच्या सुनावणीच्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयावर दबाव आणण्यासाठी रस्ते अडवून आणि निदर्शने केली. “आम्ही या संदर्भातील पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहत आहे. न्यायाच्या बाजूने निकालाची आशा आहे. जर निकाल न्यायाच्या बाजूने लागला नाही तर आम्ही कायदेशीर लढा देत राहू,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.