काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. महाविद्यालय परिसरात हिजाब परिधान करायचा नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला मुस्लीम समुदायाने विरोध केला होता. तर हिंदुत्ववादी गटाने हिजाब बंदीला समर्थन देत महाविद्यालय परिसरात मोर्चे काढले होते. यामुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापलं होतं.

या वादादरम्यान, कर्नाटकमधील एका मुस्लीम विद्यार्थिनीने बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तबस्सुम शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. तिने हिजाबऐवजी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं. तबस्सुमने कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तिने कला शाखेत ६०० पैकी ५९३ गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. २१ एप्रिल रोजी कर्नाटक बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आहे.

बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर तिने हिजाबपेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याचं कसं ठरवलं? याबाबत तबस्सुमने ‘इंडिया टुडे’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी तबस्सुम म्हणाली, “जेव्हा हिजाब बंदीचा निर्णय आला तेव्हा माझ्या पालकांनी मला त्या आदेशाचे पालन करण्यास प्रोत्साहित केलं. त्यावेळी मी दोन आठवडे कॉलेजमध्ये गेले नाही. काय करावं? याबद्दल मी संभ्रमात होते.”

“त्यानंतर, मी कॉलेजमध्ये जायला हवं, असं माझ्या पालकांनी मला समजावून सांगितलं. मला जर चांगलं शिक्षण मिळालं तर मी भविष्यात अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकेन,” असंही ती पुढे म्हणाली. तबस्सुम वयाच्या ५ वर्षापासून हिजाब परिधान करते. आज हिजाब हा तिच्या ओळखीचा एक भाग बनला आहे. हिजाब बंदीचा निर्णय आल्यानंतर ती कॉलेजच्या बाहेर हिजाब परिधान करते पण वर्गात जाताना ती हिजाब काढून जाते, असंही तिने सांगितलं.

Story img Loader