ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतील पाचवे पंतप्रधान आहेत. सुनक यांची निवड झाल्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटकातील विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी एक ट्विट केलं होतं. “ब्रिटनने एका अल्पसंख्याक समुदायातील सदस्याला पंतप्रधान बनवलं आहे. हे आपणही स्वीकारलं पाहिजं,” असं शशी थरुर म्हणाले होते. त्यावरून माध्यम प्रतिनिधींनी असदुद्दीन ओवेसी यांना प्रश्न विचारला होता.
हेही वाचा : “राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचेच, कोण होणार ते…”, आमदार निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य!
असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं की, “एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल. पण, भाजपाला मुस्लीमांना देशातून हाकलून लावायचे आहे. मुस्लीमांची दाढी, टोपी, जेवण, झोपण सर्व देशासाठी धोकादायक वाटतं. एक भाजपाचा खासदार म्हणाला, मुस्लीमांवर बहिष्कार घाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त बोलतात ‘सबका साथ सबका विकास.’ मात्र, मुसलमानांची ओळख पुसणे हेच भाजपाचे धोरण आहे,” अशा शब्दांत ओवेसेंनी भाजपावर टीका केली आहे.