मुस्लिम समाजातील महिला ही कुठल्याही मोठ्या पदावर असो. डॉक्टर, आयएएस असो किंवा आयपीएस असो त्यांना स्वतःचे केस झाकता येत नसतील किंवा त्यांनी हिजाब घातला नाही तर त्यांना मुस्लिम कसं समजलं जाईल? असं म्हणत मुस्लिम महिलांविषयी AIUDF चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. AIUDF हा आसाममधला एक राजकीय पक्ष आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट असं या पक्षाचं नाव आहे. करीमगंज या ठिकाणी बदरुद्दीन यांची सभा होती तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले बदरुद्दीन अजमल?
“बाहेरच्या भागांमध्ये मी पाहिलं आहे, मुली जेव्हा शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांच्या डोक्यावर हिजाब असतो. त्यांचं डोकं आणि नजर खाली असतं. आसामधल्या मुस्लिम मुलींनीही हिजाब घालणं, त्यातच वावरणं आवश्यक आहे. हिजाब घालणं, डोक्यावर असलेले केस झाकणं ही प्रथा आपल्या धर्मात आहे.” असंही अजमल यांनी म्हटलं आहे.
मुलींचे खुले केस हे सैतानाच्या हातील दोरीसारखे
मुलींचे, महिलांचे केस खुले असणं हे सैतानाच्या हातातल्या दोरीसारखं आहे. मुलींनी किंवा महिलांनी मेक अप करणं हे सैतानासाठी नुस्खा ठरतं. त्यामुळे बाजारात जात असाल, समाजात वावरत असाल तर तुम्ही हिजाब वापरलाच पाहिजे. तसंच मुलींची किंवा महिलांची नजर झुकलेलीच पाहिजे. विज्ञान शिका, डॉक्टर व्हा, आयएएस व्हा, आयपीस व्हा. पण मुस्लिम धर्मात जे सांगितलं आहे त्या हिजाबचा वापर सोडू नका. तुम्ही हिजाब वापरणं सोडलंत तर कळणार कसं तुम्ही मुस्लिम आहात? असाही प्रश्न बदरुद्दीन अजमल यांनी विचारला.
मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी मुस्लिम तरुणांबाबतही एक वक्तव्य केलं होतं. चोरी, लूटमार, बलात्कार, दरोडा अशा अपराधांमध्ये मुस्लिम क्रमांक एकवर आहेत असं ते म्हणाले होते त्यावरुनही वाद झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मुस्लिम महिलांबाबत वक्तव्य केलं आहे.