कर्नाटकच्या कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या मांडयामधील आहे.
Karnataka Hijab Row Live : हिजाबच्या वादामागे काँग्रेसचा हात; भाजपा कर्नाटकचा आरोप
हिजाब प्रकरण चिघळले ; कर्नाटकात सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद
या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवलं आहे”. भीख मागून आणि रडून काही मिळत नाही असं ओवैसी या व्हिडीओत म्हणाले आहेत. या मुलीने जे काम केलं त्यासाठी फार धाडस लागतं असंही ओवैसी म्हणाले आहेत.
ओवैसींनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटकमधील मुस्लीन तरुणींचं कौतुक केलं आहे. येथील मुस्लिम तरुणींनी हिंदुत्ववादी जमाविरोधात धाडस दाखवल्याचं ते म्हणाले आहेत. तरुणींना आपल्या संविधानिक अधिकारांचा योग्य वापर केला असून जे झालं त्यामागे राज्य सरकार होतं असा आरोप ओवैसींनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दोन वेळा बोलले पण एकदाही कर्नाटकमधील घटनेवर भाष्य केलं आहे. त्यांचं मौन नेमकं काय सांगतं? हेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
तरुणीने आपल्यासंबंधी काय सांगितलं आहे ?
इंडिया टुडेसोबत झालेल्या संभाषणादरम्यान मुस्कानने सांगितलं की, आपण कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. ते लोक आपल्याला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचं असं ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कॉलेजच्या आतील तर अनेक बाहेरचे होते.
पुढे तिने सांगितलं की, जेव्हा त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा मी अल्लाहू अकबरची घोषणा दिली. आपले शिक्षक आणि प्राध्यापकांनी पाठिंबा दिल्याचंही तिने म्हटलं आहे. बुरखा हटवला नाही तर आम्हीदेखील भगवा कपडा हटवणार नाही अशी धमकी ते देत होते असा आरोप तिने केला आहे. ते वारंवार मला घेरत होते असंही तिने सांगितलं आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये मुस्कान हिजाब घालून एका महाविद्यालयाच्या आवारात स्कूटीवर आल्याचं दिसत आहे. स्कूटी पार्क करून ती महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. ती पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देताना दिसत आहे.
वाद कोणत्या घटनेमुळे?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.