Belize : बेलीझध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून ट्रॉपिक एअरच्या एका छोट्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. पण याचवेळी विमानातील एका प्रवाशाने हल्लेखोरावर गोळीबार केला आणि त्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी बेलीझध्ये विमान हवेत असताना घडली.
ट्रॉपिक एअरचं एक छोटं विमान १४ प्रवाशांना घेऊन जात होतं. मात्र, यावेळी एका अमेरिकन प्रवाशाने अचानक चाकूचा धाक दाखवत विमान हवेत असताना विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तीन प्रवाशांवर हल्लाही केला, यात ते जखमी झाले. मात्र, यानंतर विमानातील एका परवानाधारक बंदुक बाळगणाऱ्या प्रवाशाने हल्लेखोरावर गोळी झाडली. यात हल्लेखोर जागीच ठार झाला. या संदर्भातील वृत्त एबीसी न्यूजच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर बराच वेळ हे विमान अवकाशात भिरट्या मारत होतं. विमानातील इंधन संपत आलं होतं. मात्र, त्यानंतर हे विमान बेलीझमध्ये उतरवण्यात आलं. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार कॅलिफोर्नियातील ४९ वर्षीय हल्लेखोराला हे विमान देशाबाहेर नेण्याची इच्छा होती, त्याने विमानासाठी अधिक इंधनाची मागणी देखील केली होती.
४९ वर्षीय संशयित हल्लेखोराचं ओळख अकिनिएला सावा टेलर अशी असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती अमेरिकन नागरिक आहे. दरम्यान, सकाळी ८:३० वाजता सॅन पेड्रोला जाणाऱ्या या विमानात ही घटना घडल्यानंतर फिलिप एसडब्ल्यू गोल्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली होती. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हा हल्लेखोर विमानात चाकू नेण्यात कसा यशस्वी झाला? यासह अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच यासाठी बेलीझच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या तपासात मदतीसाठी अमेरिकन दुतावासाशी संपर्क साधला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.