रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर गुरुवारी टीकेची तोफ डागली. हिलरी या २०१६मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतील दुबळ्या उमेदवार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता आंतरराष्ट्रीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
   एका फ्रेंच टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पुतीन यांनी हिलरी यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, बाईच्या तोंडाला न लागलेलेच बरे, कारण ज्या पद्धतीची टीका हिलरी यांनी केली आहे ते पाहता त्या काही शालीन व्यक्ती आहेत, असे मला वाटत नाही.
याआधी हिलरी यांनी टीका करताना पुतीन यांची तुलना हिटलरशी केली होती. त्या म्हणाल्या की, १९३० मध्ये हिटलर ज्या पद्धतीने युरोपची नव्याने मांडणी करण्यासाठी झटत होता त्याच मार्गाने पुतीन यांचे प्रयत्न चालू आहेत.
मुलाखतीत पुतीन पुढे म्हणाले की, हिलरी जेव्हा अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक होत्या तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. त्या माझ्याशी विविध आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर अत्यंत सविस्तरपणे बोलल्या होत्या. मला वाटते, सध्याच्या प्रश्नांवर आम्ही तोडगा काढू.
पाश्चिमात्यांची टीका असह्य़
पुतीन यांची युक्रेनमधील दादागिरी अमेरिकेला पटलेली नाहीच, पण क्रायमियाच्या विस्तारावरून पाश्चिमात्य देशांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. रशियाचे आक्रमक प्रमुख म्हणून त्यांची इतर देशांमध्ये प्रतिमा असली तरी अमेरिकेने हिटलरशी केलेली तुलना पुतीन यांच्या जिव्हारी लागलेली आहे.
‘दुबळे असणे वाईट नाही’
लोक जेव्हा आपल्या सीमा विस्तारण्यास सुरुवात करतात, याचा अर्थ ते शक्तिमान असतात म्हणून नव्हे, तर ते कमकुवत असतात, पण दुबळे असणे ही काही स्त्रीसाठी वाईट गोष्ट नाही, असा टोला पुतीन यांनी हिलरी यांना लगावला.
बिल क्लिंटन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या वेळी हिलरी यांनी सरकारमध्ये एक राजकीय दबावगट तयार केला होता. स्त्री-लढय़ातील अग्रणी म्हणून त्यांनी नाव कमावले होते. त्यामुळे त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बनतील, अशी आशा बाळगून बसलेल्या नागरिकांचा २००८ मध्ये भ्रमनिरास झाला. हिलरी निवडणुकीत हरल्या.

Story img Loader