अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जर खरोखर अध्यक्ष बनले तर अमेरिकेत काय परिस्थिती असेल अशी कल्पना करून ‘बोस्टन ग्लोब’ या वृत्तपत्राने नुकत्याच छापलेल्या अभिरूप पहिल्या पानाने तेथे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी ‘बोस्टन ग्लोब’ची ही नस्ती उठाठेव म्हणजे ‘बिनकामाचा मूर्खपणा’ असल्याचे म्हटले आहे.
‘बोस्टन ग्लोब’ने रविवारच्या अंकातील विचार या विभागात एक खोटे पहिले पान छापले. त्यावर ९ एप्रिल २०१७ अशी तारीख असून ट्रम्प अध्यक्ष झाल्यास काय होऊ शकेल असा विचार करून बातम्या दिल्या आहेत. या पानाचा मुख्य मथळा आहे, ‘डिपोर्टेशन्स टू बिगिन’. त्यासह ट्रम्प यांनी कट्टरतावाद्यांना हाकलून देण्याच्या मोहिमेसाठी अमेरिकी काँग्रेसकडे अर्थसाह्य़ाची मागणी केल्याचे वृत्त दिले असून त्यामुळे देशात जागोजागी दंगे पेटल्याचे वर्णन आहे. तसेच शेअर बाजारात घसरण, अमेरिकी सैनिकांचा आयसिसच्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्यास नकार, ट्रम्प नोबेल पारितोषिकाच्या विजेत्यांची यादी करत आहेत, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाला ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे, अशा उपहासात्मक बातम्या दिल्या आहेत.