अमेरिकेच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या दक्षिण कॅरोलिनातील लढतीत हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांना चितपट केले आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. मंगळवारी होणाऱ्या बहुराज्यीय लढती आधी त्यांनी आपले स्थान बळकट केले आहे. क्लिंटन यांनी सँडर्स यांच्यावर आघाडी घेतली, त्यात कृष्णवर्णीय मतदारांचा मोठा हातभार आहे. गेल्या वेळी या लोकांनी क्लिंटन यांच्याऐवजी बराक ओबामा यांना समर्थन दिले होते. क्लिंटन यांना आता दहापैकी नऊ आफ्रिकन अमेरिकी मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. २०१६ मधील प्राथमिक फेऱ्यांमध्ये त्यांचा हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. त्यांना न्यूहॅम्पशायरमध्ये सँडर्स यांनी पराभूत केले होते, पण आता क्लिंटन यांनी मुसंडी मारली आहे. त्यांनी नेवाडामधील लढतही जिंकली आहे. आजच्या विजयाने क्लिंटन यांना निर्णायक आघाडी मिळाली असून, पुढील मंगळवारच्या लढतीआधीच त्यांचे स्थान बळकट झाले आहे. मंगळवारी ११ राज्यात एकाच वेळी लढत होत आहे. विजयी सभेत त्यांनी सांगितले, की मंगळवारी ही लढत राष्ट्रीय होईल, त्यात एकेक मत महत्त्वाचे असेल. आम्ही काहीही गृहीत धरलेले नाही. क्लिंटन यांना ७३.५ टक्के तर सँडर्स यांना २६ टक्के मते मिळाली आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते त्यांना कृष्णवर्णीयांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, पुढील आठवडय़ात अलाबामा, टेक्सास, जॉर्जिया व इतर राज्यांत त्यांना ही आघाडी कायम ठेवावी लागेल. एमएसएनबीसीच्या चाचणीनुसार क्लिंटन यांना कृष्णवर्णीयांची ८७ टक्के मते मिळाली आहेत.

Untitled-20

Story img Loader