भारतीय कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची नक्कल करणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेत टीका करण्यात आली आहे. अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवाराने एखाद्या समुदायाविषयी असा अनादर दाखवणे हे विभाजनवादी वृत्ती सूचित करणारे आहे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय कर्मचाऱ्यांची नक्कल करून त्यांचा अनादर केला आहे, त्याचप्रमाणे इतर अनेक समुदायांविषयी त्यांनी असाच अनादर याआधीही दाखवला आहे असे क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी सांगितले.

मेरीलँड येथे इंडियन अमेरिकन्स फॉर हिलरी गटाच्या स्थापनेनंतर ते म्हणाले की, ट्रम्प यांचा प्रचार द्वेषमूलक आहे, आपल्या देशाला मित्र हवे असताना असे वक्तव्य करणे योग्य नाही. ट्रम्प यांच्या वक्तव्यातून अनेक समुदायांबाबत अनादर व्यक्त झाला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांचा एक गट स्थापन करण्यात आला असून हा गट क्लिंटन यांच्या पाठीशी राहणार आहे.  ट्रम्प यांनी असे म्हटले होते की, मी एकदा क्रेडिट कार्ड कंपनीच्या बीपीओला फोन करून त्यांचे कार्यालय देशात आहे की परदेशात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण कर्मचाऱ्याच्या उच्चारांवरून ते भारतीय असल्याचे लक्षात आले. भारतीय कर्मचाऱ्यांची अशी खिल्ली उडवल्यानंतर त्यांनी मी भारतीय नेत्यांवर रागावलेलो नाही व तो देश महान आहे असे म्हटले होते.