हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने मोठा पूर आला आहे. सलोनीच्या भडोदा गावामध्ये आभाळ फाटल्याने शेतजमिनीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत १५ वर्षीय विजय कुमारचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. डोंगराळ प्रदेशातून सध्या ठिकठिकाणी गढूळ पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार; वरूड तालुक्यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस
चंबा जिल्ह्यातील दोन गावांना पुराने वेढले असल्याची माहिती राज्य आपत्कालीन केंद्राने दिली आहे. या पुरामुळे भडोदा गावातील तीन तर कांधवारा गावातील पाच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गावातील शेकडो लोकांना पुराचा फटका बसला आहे. बचाव पथकाकडून गावातील पाच ते सहा घरांना खाली करण्यात आले आहे. या कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्रीच्या पावसाने नागपूर जलमय, वस्त्यांमध्ये पाणी
ढगफुटी झाल्यानंतर काही वेळातच किन्नौर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचवर भुस्खलन झाले आहे. प्रशासनाकडून ढिगारा उचलण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. चंबा जिल्ह्यातील जलप्रलयाची विदारक दृष्य समोर आली आहेत. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि पूल बंद करण्यात आले आहेत. शिमलासोबतच बिलासपूर, सिरमौर, सोलान, उना, हमीरपूर, कांगरा, मंडी, कुल्लू आणि लगतच्या भागांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.
२८ जुलैला हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्येही ढगफुटी झाली होती. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले होते. मुसळधार पावसामुळे सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, पंजाबच्या मोहालीतील भाविक उना जिल्ह्यातील गोबिंद सागर तलावात वाहून गेल्याची घटना देखील समोर आली आहे.