Sukhvinder Singh Sukhu Samosa Incident Viral: राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या असताना कोणत्याही घडामोडीचा कधी मोठा मुद्दा होईल याची खात्री कुणालाही देता येणार नाही. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये असंच काहीसं घडताना पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे ती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या सामोश्यांची! तक्रार ही आहे की मुख्यमंत्र्यांसाठी मागवलेले सामोसे त्यांना मिळालेच नाहीत आणि आरोप हा आहे की हे सामोसे त्यांच्या स्टाफनंच फस्त केले! आता CID या प्रकरणाची ‘सखोल’ चौकशी करत आहे!
नेमकं काय आहे हे सामोसा प्रकरण?
तर हा सगळा प्रकार आहे २१ ऑक्टोबरचा म्हणजे जवळपास तीन आठवड्यांपूर्वीचा! हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे सीआयडीच्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्या मुख्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री तिथे पोहोचलेदेखील. कार्यक्रमही पार पडला. पण कार्यक्रमानंतर चर्चा कार्यक्रमातल्या गोष्टींची न होता सुरू झाली ती सामोश्यांची! कारण मुख्यमंत्र्यांसाठी नजीकच्या रेडिसन ब्लू हॉटेलमधून तीन बॉक्स समोसे मागवले होते. पण कार्यक्रम संपल्यानंतरदेखील मुख्यमंत्र्यांना काही हे सामोसे मिळाले नाहीत.
सामोसे मिळाले नाहीत हे पाहून सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पर्यटन विभागाला विचारणा केली तेव्हा हे सामोसे मुख्यमंत्र्यांच्या स्टाफने खाल्ल्याचं समोर आलं. ज्या महिला अधिकाऱ्याला या सर्व व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्या अधिकाऱ्याला हे सामोसे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मागवले होते ते माहितीच नव्हतं असंही समोर आलं.
CID चौकशी? काँग्रेस म्हणतेय ‘असं काहीही नाही’!
दरम्यान, सामोसे प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी चालू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. पण हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारकडून मात्र असे कोणतेही चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले नसून सीआयडी त्यांच्या स्तरावर ही चौकशी करत असेल, अशी भूमिका मांडली आहे. तसेच, विरोधी पक्ष भाजपाकडून या मुद्द्यावर अकारण वाद पेटवला जात असल्याची टीकाही काँग्गरेसकडून करण्यात आली आहे. भाजपाकडे कोणताही मुद्दा नसून त्यामुळे ते या गोष्टीतून अपप्रचार करून सरकारविरूद्ध वाद पेटवत असल्याचीही टीका काँग्रेसनं केली आहे.
सीआयडी म्हणतेय ‘चौकशी ही अंतर्गत बाब’
एकीकडे सामोसा प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची चर्चा चालू असताना दुसरीकडे हिमाचल प्रदेश सीआयडीनं मात्र ही चौकशी म्हणजे विभागाची अंतर्गत बाब असल्याचं नमूद केलं आहे. ‘मुख्यमंत्री हे आमचे कार्यक्रमासाठीचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व अधिकारी बसून चहापान करत होते. त्यावेळी काहीतरी मागवण्यात आलं होतं आणि त्याचं काय झालं याचाच फक्त शोध घेतला जात आहे. पण त्यावरून मोठा वाद केला जाणं दुर्दैवी आहे’, अशी भूमिका सीआयडीकडून मांडण्यात आली आहे.