Police Lathicharge in Shimla: गेल्या काही दिवसांपासून शिमल्यामध्ये एका मशि‍दीवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिमल्यातील संजौली भागातल्या एका मशि‍दीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून तिथलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिसांमध्ये आज सकाळी वाद झाला. परिणामी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी संजौली भागातली परिस्थिती तणावपूर्ण झाली.

नेमकं प्रकरण काय?

संजौली भागातल्या एका मशि‍दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी केला होता. त्यावरून तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या होत्या. हे बांधकाम पाडण्यात यावं, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. आपल्या मागण्यांसाठी शिमला विधानसभेच्या जवळच असणाऱ्या चौरा मैदानात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती, असं सांगितलं जात आहे.

परवानगी नसताना मोर्चा निघाल्यामुळे पोलिसांनी आज सकाळी आधी आंदोलकांना माघार घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतरही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच, पाण्याचा तीव्र मारा आंदोलकांवर करण्यात आला.

कायद्यानं निर्णय होईल – मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी लोकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं विधान केलं होतं. मात्र, आंदोलनादरम्यान, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होता कामा नये, असंही ते म्हणाले होते. स्थानिक न्यायालयामध्ये मशीदीतील बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली असून कायद्यानुसार या प्रकरणाचा निर्णय घेतला जाईल, असं सुखू यांनी नमूद केलं होतं.

Himachal Pradesh : काँग्रेसच्या मंत्र्याचं भाषण ऐकताच भाजपा आमदारांचा जल्लोष, तर मुख्यमंत्री स्तब्ध; हिमाचलच्या विधानसभेत काय घडलं?

या प्रकरणामुळे संजौली व आसपासच्या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धुडकावून जमावाने मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी कारवाई केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या मशीदीमध्ये बेकायदेशीररीत्या अतिरिक्त मजल्याचं बांधकाम करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याचा निषेध म्हणून काही हिंदू संघटनांनी बंदचं आवाहनही केलं होतं.

Live Updates