हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील नुरपूर भागात सोमवारी संध्याकाळी स्कूल बसला भीषण अपघात झाला. बस १०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतरही एका विद्यार्थ्याने प्रसंग ओळखून हिम्मत दाखवल्यामुळे दहा मुलांचे प्राण वाचवता आले. पाचव्या इयत्तेत शिकणारा रणबीरही या अपघातात जखमी झाला होता. पण रणबीरने स्वत:च्या दुखापती बाजूला ठेवल्या व दरीतून बाहेर पडल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना अपघाताची माहिती दिली. त्यामुळे अन्य दहा मुलांना वाचवता आले.
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानंतर बस दरीत कोसळत असताना रणबीर बसबाहेर फेकला गेला. अपघातानंतर मी काहीवेळ बेशुद्ध होतो. जशी मला शुद्ध आली मी काठी आणि गवताच्या आधाराने रस्त्यावर आलो. त्यानंतर लगेचच लोकांना अपघाताची माहिती दिली असे रणबीरने सांगितले.
या अपघातात रणबीरच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे. रणबीरचे वडिल शेतकरी असून तो गुरुचार गावात राहतो. या भीषण अपघातात २७ विद्यार्थ्यांसह एकूण २९ जणांचा मृत्यू झाला.