भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळ्या करणाऱ्या पर्वतरांगेत मोठे भूकंप होण्याची शक्यता असल्याचा इशारा हिमालयाचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या एका गटाने दिला आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे, की हिमालयाची पर्वतरांग ही भारतीय व आशिया खंडातील भूस्तरीय चकत्यांच्या टकरीतून निर्माण झाली व ती अजूनही टिकून आहे. आशिया व भारत यांना विभाजित करणारा मेन हिमालयन थ्रस्ट नावाचा प्रस्तरभंग आहे. या प्रस्तरभंगाचे अधिक स्पष्ट चित्र तयार करण्यासाठी स्टॅनफर्डचे भूगर्भशास्त्रातील संशोधक वॉरेन काल्डवेल यांनी भूपृष्ठीय हालचालींची माहिती २० भूकंपलहरी मापकांच्या मदतीने मिळवली असून त्याचे विश्लेषणही केले आहे. ‘नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ या संस्थेने भूंकपमापक दोन वर्षे या भागात बसवण्यासाठी मदत केली होती. या माहितीवरून असे दिसून येते, की पृथ्वीचे भूकवच हा उत्तरेकडे दोन ते चार अंश झुकलेले आहे. त्याचा एक तुकडा हा किमान २० किलोमीटर अंतरापर्यंत १५ अंश झुकलेला असतो. एक प्रकारे यात हा चढ म्हणजे (रॅम्प) हिमालयातील मोठय़ा भूकंपाचा केंद्र ठरू शकतो. काल्डवेल यांचे संशोधन हे प्रस्तरभंगाच्या चित्रणाशी संबंधित आहे. त्यात भूंकपाचे अनुमान करण्याचा उद्देश नाही पण एमएचटी म्हणजे मुख्य हिमालय भूकवच हा प्रस्तरभंग यापूर्वीही शेकडो वर्षांतील ८ ते ९ रिश्टर तीव्रतेच्या भूंकपांना कारण ठरला आहे. आतापर्यंत निरीक्षणात जाणवत होते त्यापेक्षा अधिक उत्तरेकडे हा चढ (रॅम्प) आहे, त्यामुळे भूस्तरभंग होऊन मोठय़ा तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. काल्डवेल यांचे सल्लागार प्राध्यापक सिमॉन क्लेम्पेरर यांनी सांगितले, की मुख्य हिमालय भूकवचाच्या  (एमएचटी) आजूबाजूला शिलारस व पाणी सापडले आहे. त्यातून भूकवचाच्या कुठल्या भागात भूंकपाच्या वेळी छेद जाऊ शकतो याचा काहीसा अंदाज करता येऊ शकतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिणेकडे असा छेद जाण्याची शक्यता जास्त आहे पण उत्तरकडे असा मोठा छेद जाण्याची शक्यता नाही असे क्लेम्पेरर यांचे मत आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा