Himani Narwal : काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल ( Himani Narwal ) यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. हरियाणातल्या रोहतकमध्ये ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पक्षाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
नेमकी काय घटना घडली?
हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाने निळ्या रंगाच्या सुटकेसकडे पाहिलं. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. कुतुहल असल्याने काही लोक जवळ गेले, मात्र त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला कारण या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणी कोण हे समजलं नव्हतं. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal ) यांचा असल्याची माहिती समोर आली.
ओळख कशी पटली?
काही लोकांनी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर तो व्हायरल झाला. याबाबतची माहिती रोहतकचे आमदार बीबी बात्रा यांना मिळाली. त्यांनी या तरुणीची ओळख पटवली आहे. हिमानी नरवाल ही काँग्रेसमध्ये सक्रीय होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत होती. हिमानीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही अनेकदा सहभाग घेतला होता. राहुल गांधींबरोबरचे तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच हिमानी नरवाल ( Himani Narwal ) यांचा मृतदेह रोहतक या ठिकाणी बॅगेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
बीबी बत्रा यांनी काय म्हटलं आहे?
बी.बी. बत्रा यांनी हिमानी नरवाल हत्या ( Himani Narwal ) प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी अशी मागणी केली आहे. तसंच हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्था संपल्यात जमा आहे असाही आरोप केला आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती आणि धाक उरलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसंच या तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी सरकारने आवश्यक ती सगळी पावलं लवकरात लवकर उचलली पाहिजेत अशी मागणी केली आहे.