Himani Narwal हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहितीही दिली आहे. हिमानी नरवाल यांची हत्या केल्याच्या आरोपांखाली ही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
रोहतक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना दिल्लीतून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. काही तास चौकशी केल्यानंतर त्यातला एकाला पोलिसांनी अटक केली. आम्ही आता ज्या आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून माहिती घेत आहोत. हिमानी यांच्या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का? हे आम्ही जाणून घेत आहोत. तसंच सोमवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. हिमानी नरवाल या अटक करण्यात आलेल्या आरोपीला ओळखत होत्या अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस उप अधीक्षक रजनीश कुमार यांनी काय सांगितलं?
पोलीस उप अधीक्षक रजनीश कुमार यांनी सांगितलं की “सूटकेसमध्ये मृतदेह मिळाल्यानंतर आम्ही त्या मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह हिमानी यांचा आहे हे समजल्यानंतर आम्ही कुटुंबीयांकडून त्यासंदर्भातली खात्री पटवली. आता आम्ही या घटनेच्या प्रत्येक पैलूची चाचपणी करत आहोत. आम्हाला काही पुरावेही मिळाले आहेत मात्र तपास सुरु असल्याने आम्ही ते उघड करु इच्छित नाही. या प्रकरणात आम्ही सायबर सेल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचीही मदत घेत आहोत. तसंच ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून बघत आहोत.”
नेमकी घटना काय घडली?
हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाने निळ्या रंगाच्या सुटकेसकडे पाहिलं. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. कुतुहल असल्याने काही लोक जवळ गेले, मात्र त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला कारण या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणी कोण हे समजलं नव्हतं. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal ) यांचा असल्याची माहिती समोर आली.