गेल्या दोन दिवसांपासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी एका सभेत बोलताना सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा नेते, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधींच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा म्हणाले, माझा स्टॅलिनच्या मुलावर आक्षेप नाही, माझा आक्षेप हा काँग्रेसवर आहे. स्टॅलिनने जे वक्तव्यं केलं तेच चिदंबरम यांच्या मुलाने केलं. तेच वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. तेच खरगे यांच्या मुलाने केलं. सनातन धर्म नष्ट करण्याबद्दल ते बोलले, परंतु, हा उद्देश केवळ स्टॅलिन यांच्या मुलाचा नाही तर काँग्रेसचंही तेच उद्दीष्ट आहे. काँग्रेसवाले आता म्हणत आहेत की ते त्यांचं (उदयनिधी, चिदंबरम) बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मग मला काँग्रेसला विचारायचं आहे की, उद्या मी जर असं काही बोललो तर चालेल का?
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, मी जर उद्या मुस्लीम धर्माबद्दल असं वक्तव्य केलं. ख्रिश्चनांविरोधात असं वक्तव्य केलं तर काँग्रेस म्हणेल का हे माझं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतात जर कोण बोललं की मी इस्लाम संपवेन, मी ख्रिश्चन धर्म संपवेन, इस्लाम धर्म कोरोनासारखा संपायला हवा असं कोण बोललं तर त्याला ते बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणतील का?
हे ही वाचा >> “प्रज्ञानपाठोपाठ ‘विक्रम’ही झोपी गेला, आता थेट…”, इस्रोकडून चांद्रमोहिमेचा पुढचा प्लॅन जाहीर, म्हणाले…
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, माझं म्हणणं एवढंच आहे की हिंदू असो वा मुस्लीम असो, अथवा ख्रिश्चन धर्म असेल, तुम्ही तो धर्म संपवण्याची भाषा का करता? हे योग्य नाही. परंतु, या सगळ्यामागचा मुख्य सूत्रधार हा वेगळाच आहे. राहुल गांधी हे यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या इशाऱ्यानेच हे सगळं सुरू आहे.