Jharkhand Politics : झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील प्रमुख नेते आणि आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पाठोपाठ झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हेमंत सोरेन पुन्हा एकदा राज्याचा कारभार आपल्या हाती घेणार आहेत. अनेकजण आता हेमंत सोरेन यांना शुभेच्छा देऊ लागले आहेत, त्यांचं अभिनंदन करू लागले आहेत. भाजपाचे नेते व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.

चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यावर हिमंता बिस्व सरमा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरमा म्हणाले, वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवणं क्लेशदायक आहे. मला खात्री आहे की, झारखंडची जनता या कारवाईचा निषेध करेल आणि यावर तीव्र प्रतिक्रिया समोर येतील.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पार्टीने एका वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेदनादायी निर्णय आहे. झारखंडची जनता या निर्णयाचा निषेध करेल याची मला खात्री आहे.” दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांनी सत्ताबदलाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. मात्र पक्षातील इतर नेत्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्यानंतर हेमंत सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

चंपई सोरेन यांनी काही वेळापूर्वी रांची येथील राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यापाठोपाठ हेमंत सोरेन राजभवनात दाखल झाले आहेत. हेमंत सोरेन उद्या (४ जुलै) तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासंदर्भातील कार्यवाहीसाठी हेमंत सोरेन राजभवानावर दाखल झाले आहेत. हेमंत सोरेन हे उद्या झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनणार आहेत.

हे ही वाचा >> ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, आठवड्याभरात दुसऱ्यांदा प्रकृती खालावली

आंचल जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ३१ जानेवारी २०२४ रोजी हेमंत सोरेन यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. मात्र अटकेपूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता झारखंड उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रं हाती घेणार आहेत.