महाराष्ट्राबरोबर झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या टीका टीप्पणीला उधाण आलं आहे. अशातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लिमांबाबत एक विधान केलं आहे. झारखंडमध्ये मुस्लिमांची संख्या वाढत असून आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी होत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच बांगलादेशमधून होत असलेल्या घुसखोरीमुळे मुस्लिमांची संख्या वाढत असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी झारखंडच्या संथाल परगना भागातील एका प्रचारसभेत बोलताना मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत विधान केलं. संथाल परगणामधील आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने कमी होते आहे, तर मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याची दोन कारणं आहेत, एकतर प्रत्येक कुटुंब १०-१२ मुलं जन्माला घालत आहेत किंवा बांगलादेशातील मुस्लीम लोकं झारखंडमध्ये घुसखोरी करत आहेत, इतकं साधं गणित आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Himanta Biswa Sarma : “मियाँ मुस्लिमां”ना आसामचा ताबा घेऊ देणार नाही; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं विधान

पुढे बोलताना झारखंडमध्ये विजयाचा विश्वासही व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा नक्कीच विजय होईल. मात्र, निवडणूक जिंकणे हा आमचा एकमेव उद्देश नाही, तर झारखंडमधील मुस्लील घुसखोरांना राज्यातून हाकलून लावणे आणि महिलांना न्याय देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ज्याप्रमाणे हनुमान यांनी रावणाची लंका दहन केली, त्याप्रमाणे आम्हीही झारखंडमधील घुसखोरांची लंका दहन करू, असे ते म्हणाले.

हेही वाचा – आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

यावेळी बोलताना त्यांनी झारखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यास एनआरसी लागू करू, असं आश्वासनही दिलं. झारखंडमध्ये घुसखोरी केलेल्या मुस्लिमांना मदरशामध्ये प्रशिक्षण दिलं दिले जाते. त्यानंतर त्यांची आधार कार्ड नोंदणी केली जाते. अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आम्ही एनआरसी लागू करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.