काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय जोडो यात्रा’ आसाममध्ये आहे. आज ( २२ जानेवारी ) राहुल गांधी नागाव जिल्ह्यातील संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी बाटाद्राव थान येथे जाणार होते. पण, राहुल गांधींना श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी ट्वीट करत राहुल गांधींना डिवचलं आहे.
राहुल गांधींचा ताफा नागाव येथे पोलिसांकडून रोखण्यात आला. यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन केलं. स्थानिक खासदार, आमदार वगळता अन्य कुठल्याही काँग्रेस नेत्याला मंदिराच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही. यावेळी राहुल गांधींनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याला प्रश्नांचा भडीमार केला.
“मला फक्त एक सांगा माझी चूक काय? मला मंदिरात जाण्यापासून का रोखलं जात आहे? आम्ही कुठलाही नियम मोडलेला नाही. मला मंदिरातून निमंत्रण मिळालं आहे. आम्हाला मंदिरात जायचं आहे. तरीही का रोखण्यात येत आहे?” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
या घटनेनंतर हिंमता बिस्व सरमांनी ‘एक्स’ अकाउंटवर दोन वाक्यांत ट्वीट केलं आहे. “राम राज्य”, असं लिहित हिंमत बिस्व सरमांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “२२ जानेवारीला आम्ही मंदिरात सकाळी ७ वाजता जाणार होतो. पण, अचानक आम्हाला ३ वाजेपर्यंत तेथे येऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. राज्य सरकारकडून दबाव टाकण्यात येत आहे,” असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.