Hindenburg on Madhabi Puri Buch: गेल्या काही दिवसांपासून सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच या चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने काही दिवसांपूर्वी अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळापर्यंतही जोरदार पडसाद उमटले होते. त्यानंतर मंगळवारी (१० सप्टेंबर) माधबी पुरी बूच यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. माधबी पुरी बूच यांनी काही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या आरोपामुळे मोठी खळबळ उडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या आरोपानंतर माधबी पुरी बूच यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्चने माधबी पुरी बूच लक्ष्य केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने या संदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “माधबी पुरी बूच यांच्यावर अलीकडेच अनेक अनियमिततेचे आरोप झाले आहेत. मात्र, तरीही सेबीच्या प्रमुख गप्प का आहेत?”, असा सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Congress on Madhabi Puri Buch : “माधबी पुरी बूच यांनी कोट्यवधींची…”, काँग्रेसच्या नव्या आरोपाने खळबळ

हिंडेनबर्गने काय म्हटलं आहे?

हिंडेनबर्ग रिसर्चने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “जे नवीन आरोप समोर आले आहेत. ते असे दर्शविते की, सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच यांची ९९ टक्के शेअरहोल्डिंग असलेली खासगी सल्लागार कंपनी त्यावेळी अनेक सूचीबद्ध कंपन्यांकडून पेमेंट घेत होती. जेव्हा त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, डॉ.रेड्डीज आणि पिडीलाइट यांचा समावेश आहे. हे आरोप बूच यांच्या भारतीय सल्लागार कंपनीशी संबंधित आहेत. त्याच्या सिंगापूरस्थित सल्लागार कंपनीबाबत कोणताही तपशील समोर आलेला नाही. या संदर्भात अनेक आठवड्यांपासून सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच यांनी पूर्ण मौन बाळगलं आहे”, असं हिंडेनबर्ग रिसर्चने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसने कोणते सवाल केले होते?

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत माधबी पुरी बूच यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामध्ये माधबी पुरी बूच यांनी ‘अगोरा’च्या माध्यमातून २ कोटी ९५ लाख रुपये कमावले यासह अनेक खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केले होते. तसेच यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला काही सवालही केले होते. “त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे का? की सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांचे ‘अगोरा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ९९ टक्के शेअर्स आहेत?, जेव्हा तुम्ही माधबी पुरी बूच यांना सेबीने चेअरपर्सन बनवले तेव्हा कोणत्याही एजन्सीने तुम्हाला अहवाल दिला नाही का?, सेबीद्वारे तपास करत असलेल्या कंपन्यांशी ‘अगोरा’चे आर्थिक-व्यावसायिक संबंध आहेत हे तपास यंत्रणांनी तुम्हाला सांगितले नव्हते का? माधबी पुरी बूच यांना इतर कंपन्यांकडून इतके पैसे कसे मिळत होते? याचा पुरावा कोणी तुमच्यासमोर मांडला नाही का? जर हा पुरावा समोर ठेवला असता, तर अजून कसली संगनमत चालू आहे? शेवटी फायदा कोणाला होतोय आणि कुणाला का वाचवले जात आहे?”, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindenburg on madhabi puri buch hindenburg researchs new allegations against sebi chairperson madhabi puri buch gkt