गेल्या काही दिवसांपासून देशभरात Hindenburg Research च्या अहवालाची जोरदार चर्चा चालू आहे. या अहवालामध्ये देशातील अग्रगण्य अदाणी उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदाणी उद्योग समूहाकडून देशाची फसवणूक होत असून गेल्या अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार कंपनी असलेल्या हिंडनबर्गनं केला आहे. या अहवालाचे तीव्र पडसाद भारतात आणि विशेषत: भारतीय बाजारपेठेत उमटले आहेत. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदाणी उद्योग समूहाला तब्बल ४.२ लाख कोटींच्या बाजार भांडवलाचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या सर्व आरोपांना अदाणींनी रविवारी रात्री तब्बल ४१३ पानांचं उत्तर दिल्यानंतर त्यावरून हिंडनबर्गनं खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
Hindenburg च्या आरोपांवर अदाणींचं उत्तर
‘हिंडनबर्ग रिसर्च’च्या आरोपांवर अदाणींनी तब्बल ४१३ पानांचं उत्तर दिलं आहे. ‘हिंडनबर्गकडून करण्यात आलेले आरोप म्हणजे भारतावर ठरवून करण्यात आलेला हल्ला आहे. कंपनीवर करण्यात आलेले आरोप खोटे असून अमेरिकेतील कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे’ असं अदाणींनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे. तसेच, ‘भारताची स्वतंत्रता, अखंडता, गुणवत्ता आणि विकासावर हा हल्ला आहे. अशा विश्वासार्ह आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे’, असं अदाणींनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.
दरम्यान, अदाणींच्या या आरोपांना हिंडनबर्गनं सविस्तर उत्तर दिलं आहे. “फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा देऊन दिशाभूल केली जाऊ शकत नाही. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्व आरोपांना निराधार पद्धतीने दिलेलं उत्तर हा यासंदर्भात खुलासा होऊ शकत नाही”, असं हिंडनबर्गनं आपल्या प्रत्युत्तरात म्हटलं आहे.
‘Hindenburg’च्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “हा भारतावर…”
“फसवणूक ही फसवणूकच असते”
अदाणींकडून आलेल्या उत्तरावर सविस्तर प्रत्युत्तर देताना हिंडनबर्गकडून अदाणी श्रीमंत असल्यामुळे त्यांच्या फसवणुकीकडे डोळेझाक करता येणार नाही असं नमूद केलं आहे. “आम्हाला असं वाटतं की जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने केली असली तरी फसवणूक ही फसवणूक असते. भारताच्या भवितव्यावर अदाणी उद्योग समूहाचा परिणाम होत आहे. अदाणी उद्योग समूहाने एकीकडे देशाची लूट चालवली असताना दुसरीकडे स्वत:ला राष्ट्रभक्तीच्या आवरणात गुंडाळून घेतलं आहे”, असंही Hindenburg नं आपल्या प्रत्युत्तरात नमूद केलं आहे.
४१३ पैकी फक्त ३० पानं मुद्द्याची?
हिंडेनबर्गनं दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये ४१३ पैकी फक्त ३० पानं ही आम्ही आमच्या अहवालात मांडलेल्या प्रत्यक्ष मुद्द्याशी संबंधित आहेत, असा दावा हिंडैनबर्गनं केला आहे. “आमच्या रिपोर्टमध्ये एकूण ८८ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पण त्यापैकी ६२ प्रश्नांची उत्तरं देण्यात अदाणी ग्रुप अपयशी ठरला आहे. त्याऐवजी त्यांनी ढोबळ पद्धतीने उत्तरं दिली आहेत”, असं हिंडेनबर्गनं आपल्या प्रत्युत्तरात म्हटलं आहे.
“काही ठिकाणी तर अदाणींनी फक्त त्यांनी दिलेल्या आधीच्या उत्तरांचाच दाखला देऊन प्रश्नावर प्रतिक्रिया दिल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या बाबतीतही ते समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहेत”, असंही यात नमूद केलं आहे.