तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी नुकतेच उत्तर भारतीयांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले. उत्तर प्रदेश, बिहारमधून येणारे लोक तमिळनाडूमध्ये बांधकाम प्रकल्प, रस्ते आणि शौचालय साफ करण्याचे काम करतात, असे विधान मारन यांनी एका भाषणादरम्यान केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनीही आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर ही क्लिप शेअर करून इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील इंडिया आघाडीचे नेते या वक्तव्यावर का बोलत नाहीत? असा सवाल शेहजाद पुनावाला यांनी उपस्थित केला.
हे वाचा >> “हिंदी अविकसित राज्यांची भाषा; आपल्याला क्षुद्र बनवतील”; डीएमके खासदाराचं वक्तव्य
आपल्या भाषणात मारन यांनी इंग्रजीचे शिक्षण घेणारे आणि फक्त हिंदीमध्ये शिकणाऱ्यांची तुलना केली आहे. ते म्हणाले, इंग्रजी शिकणारे आयटी कंपन्यात काम करतात आणि हिंदी शिकणारे क्षुल्लक कामे करतात.
इंडिया आघाडी भारतातील लोकांना जात, भाषा आणि धर्माच्या आधारावर विभागणी करत आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी केला. तसेच द्रमुकच्या खासदाराचा साधा निषेधही न नोंदविणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. पुन्हा एकदा भारतामध्ये फूट पाडून राज्य करण्याची खेळी खेळली जात आहे, असे कॅप्शन पुनावाला यांनी ‘एक्स’ वरील पोस्टला दिली आहे.
आणखी वाचा >> VIDEO : “भाजपाची ताकद फक्त गोमुत्र राज्ये जिंकण्यापुरतीच,” द्रमुकच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
पुनावाला यांनी पुढे म्हटले की, खासदार दयानिधी मारन यांचे वक्तव्य दुर्दैवी आहेच आणि द्रमुक पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत असताना सदर विधान व्हावे, हा योगायोग नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील इंडिया आघाडीचे नेते गप्प का आहेत? नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू यादव, काँग्रेस, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे काहीच घडले नाही, असे का वागत आहेत? ते कधी भूमिका घेणार आहेत की नाही? असा सवाल पुनावाला यांनी उपस्थित केला.