पंकज भोसले, लोकसत्ता
जयपूर : मराठीत रहस्य-भूत कथा साहित्याचे युग लोटून काही दशके लोटली असताना आणि प्रस्थापितांकडून त्यांना त्याज्य मानण्याची परंपरा कायम राहिली असताना हिंदीत मात्र प्रवाह उलटलेला पाहायला मिळत आहे. लोकप्रिय साहित्याला सीमेबाहेर न ठेवता तेथे विकले जाणारे सारेच साहित्य हे आता मुख्य धारेतले समजले जात असल्याची माहिती प्रसिद्ध लेखक, हिंदी साहित्याचे समीक्षक आणि लोकप्रिय साहित्याचे निरीक्षक प्रभात रंजन यांनी दिली.
जयपूर आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवामधील प्रमुख संवादकांच्या ताफ्यात असलेल्या प्रभात रंजन यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये समांतर हिंदी साहित्यातील घडामोडी, कथन आणि अकथनात्मक साहित्यातील बदललेल्या आशय-विषय यांवर सविस्तर चर्चा केली. पुढील काळात हिंदी पुस्तकांपुढे ऑडिओ बुक्सशी स्पर्धा करणे हे सर्वात मोठे आवाहन असेल, हेही त्यांनी नमूद केले.
जानकीपूल नावाचा हिंदीतील सर्वाधिक वाचला जाणारा ब्लॉग गेल्या दशकापासून लिहिणारे प्रभात रंजन हे पूर्वाश्रमीचे पत्रकार असून कथा, कादंबरी, समीक्षा आणि अनुवाद या सर्वच क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान आहे. मनोहर श्याम जोशी यांच्या आठवणींवर लिहिलेले त्यांचे ‘पालतू बोहेमेनियन’ हे पुस्तक प्रचंड गाजले असून साठच्या दशकापासून सुरू असलेल्या हिंदीतील लगदा साहित्यावर (पल्प फिक्शन) आलेले त्यांचे पुस्तक गेले काही महिने चर्चेत आहे.
पूर्वी जेव्हा रहस्य-भूत-गुन्हेगारी कथा जोमाने वाचल्या जात तेव्हा परशुराम शर्मा, ओमप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन पाठक यांच्या पुस्तकांच्या एकाच वेळी दीड-दोन लाखांच्या प्रती छापल्या जात आणि अल्पावधीत त्यांची विक्रीही होत असे. त्यांचे प्रकाशक तेव्हा वेगळे होते. ते अतिशय स्वस्त अशा लगदा कागदावर ही पुस्तके छापून स्वस्तात वाचकांना उपलब्ध करून देत. त्यांची मुखपृष्ठे आणि निर्मितीमूल्य उत्कृष्ट नसली, तरी लेखनाच्या गुणवत्तेच्या आधारावर ती खपत. केवळ या गुणांमुळे वाचकांकडून ती खरेदी केली जात. पण साहित्याच्या पारंपरिक भूमीत या लेखकांना कधीच सन्मान मिळाला नव्हता. आता हिंदीतील जवळजवळ सर्वच मुख्य प्रकाशकांचा या लोकप्रिय पुस्तकांना छापण्याकडे कल वाढला आहे. या प्रकाशकांनी छापलेल्या पांढऱ्या कागदातील पुस्तकांच्या २० ते २५ हजार प्रती चटकन संपत आहेत. नव्वदी इतका या कथाप्रकाराला वाचणारा वर्ग आज नाही. हा वर्ग टीव्ही आणि तेथील ‘क्राईम पेट्रोल’, ‘क्राईम डायरी’ यासारख्या पर्यायांमुळे कमी झाला. तरीही साऱ्या लगदा साहित्यिकांना याआधी कधी मिळाला नव्हता तितका मान-सन्मान आणि ओळख सध्या मिळत आहे, याकडे प्रभात रंजन यांनी लक्ष वेधले.
गंभीर साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजकमल प्रकाशनासह सारेच मुख्य प्रकाशक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या कादंबऱ्या आणि इतर लेखन छापण्यासाठी तयार आहेत. हे चित्र दोन हजार सालापूर्वी संपूर्ण उलट होते, याकडे रंजन यांनी लक्ष वेधले.
देशात अगदी अलीकडेपर्यंत निरक्षर पट्टा म्हणून हिंदी भाषिक राज्यांना ओळखले जात होते. मात्र जसजशी साक्षरता वाढत आहे, तसे लेखकांचे नवे जथ्थे आपल्या अनुभवांची कथाप्रारूपे घडवत आहेत. स्थानिक राजकारण, ग्रामीण भागाची बदलती पार्श्वभूमी, नव्वदोत्तरीतील ग्लोबल जाणिवा या सगळय़ांना कथन साहित्यात महत्त्वाचे स्थान आले आहे. दलित लेखक आणि महिलांच्या लेखनाचा नवा प्रवाह तयार झाला आहे, असेही प्रभात रंजन यांनी सांगितले.
दीर्घ कथांचे युग..
हिंदीच्या मुख्य धारेतील कथात्म साहित्यामध्ये ‘लंबी कहानी’ हा प्रकार उदय प्रकाश यांनी १९९० च्या दशकात सुरू केला. हंस आणि इतर मासिकांनी तो रूढ केला आणि आता जवळजवळ येणाऱ्या सर्व मासिक, लघुनियतकालिक, अनियतकालिकांत तो प्रचलित झाला आहे. प्रवीण कुमार, गीत चतुर्वेदी, पंकज कबीर, मनोज पांडेय, पंकज मित्र, चंदन पांडेय आदी तरुण लेखक हा प्रकार अतिशय ताकदीने हाताळत आहेत.
नायक-नायिकांच्या कथा बाद..
पूर्वी हमखास खपणाऱ्या नायक-नायिकांच्या हळुवार प्रेमकथा आता बाद झाल्या असून लेखकाच्या अनुभवविश्वावर आधारलेल्या कथात्म आणि अकथनात्मक कथांचे सर्वच वाचक स्वागत करीत आहेत. इतिहासातील एखादी व्यक्तिरेखा घेऊन त्याचा सविस्तर शोध घेणारे लेखन येत आहे. करोनाकाळावरही कादंबरी आली आहे आणि निश्चलनीकरणानंतर काहीच महिन्यांत त्या विषयाला केंद्रित करणाऱ्या कथा आल्या आहेत. सरकारनीती आणि त्याचा जनतेवरचा परिणाम दर्शवणाऱ्या विडंबनकथाही लोकप्रिय होत आहेत.
हिंदीचे पुस्तक विक्रीतील गणित गेल्या काही वर्षांत इतके बदलले आहे, की प्रकाशक अशाच लेखकांना छापू पाहत आहे, ज्यांच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री होईल. रहस्यकथा-भूतकथा सर्वसाधारण वाचकांसाठी असलेला प्रकार नसल्याची चुकीची समजूत करून देण्यात आली होती. आता हे चित्र पूर्ण बदलले आहे.
– प्रभात रंजन.
मुद्रित माध्यमापुढील आव्हाने
संपूर्ण करोनाकाळात पुस्तकांऐवजी ऑनलाइन साहित्याकडे कल वाढला. लिहिणारे, ए्रेकणारे आणि त्यासाठी निर्मिती करणारे वाढले. लेखक फेसबुकवर कथा लिहू लागले आणि यू टय़ुबवर त्यांचे व्हिडीओ बनवू लागले. हे प्रमाण आता इतके वाढत चालले आहे, की पुढील काही वर्षांत सारे काही मोफत ऑडिओ बुक्स म्हणूनच येणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. अलीकडच्या काही वर्षांतच हिंदीत लेखकांना यथोचित मानधन आणि मान्यता मिळू लागली आहे, हे सारे ऑडिओ बुक्सच्या नादात गिळंकृत होऊ शकते.
मराठीला वेगळे समजत नाही
मराठी साहित्याला आम्ही वेगळे कधीच समजत नाही, इतके तातडीने आमच्याकडे ते अनुवादित होत असते. नामदेव ढसाळ, लक्ष्मण गायकवाड, हेमंत दिवटे यांचे साहित्य खूप मोठय़ा प्रमाणावर हिंदीत वाचले गेले. अक्करमाशी लिहिणारे शरणकुमार लिंबाळे पहिल्यांदा हिंदीत मग मराठीत छापले गेले.