गेल्या काही काळापासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी बलाढ्य रशियाने हल्ला केल्यापासून हे युद्ध सुरू असून युक्रेनकडून चिवट लढा दिला जात आहे. रशियाकडून युक्रेनवर दररोज हल्ले केले जात आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो नागरिकांचं स्थलांतर झालं आहे.
देशात युद्धजन्य परिस्थिती असताना युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटमुळे भारतात सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदू देवता कालीमातेशी साम्य असलेला एक आक्षेपार्ह फोटो फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून संबंधित ट्वीट ‘हिंदूफोबिक’ असल्याचं म्हटलं आहे. शिवाय याप्रकरणी युक्रेन सरकारने माफी मागावी, अशी मागणीही नेटकऱ्यांनी केली.
खरं तर, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक स्फोटाचा फोटो शेअर केला असून त्याला “वर्क ऑफ आर्ट” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोसारखा अपस्कर्ट पोजमध्ये एका महिलेचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो हिंदू देवता कालीमातेशी साम्य आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्वीट केल्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर संबंधित ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे.
याप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विटरवर म्हटलं की, अलीकडेच युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री भारताकडून पाठिंबा मागण्यासाठी दिल्लीत आले होते. पण युक्रेन सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांनी एका प्रोपगंडा पोस्टरवर भारतीय देवी काली मातेचं व्यंगचित्र काढलं आहे. हा जगभरातील हिंदूंच्या भावनांवर केलेला आघात आहे.