काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारच्या धर्मसंसदेबाबत त्याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. धर्म संसदेत घडलेल्या प्रकारावरही त्यांनी टीका केली होती. त्यानंतरा आता हैदराबादमधील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी, हिंदूंच्या हितातच राष्ट्रहित आहे, असे म्हटले आहे. याआधी मोहन भागवत यांनी धर्मसंसदेतल्या वक्तव्यावंर असहमती व्यक्त दर्शवली होती. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले होते.
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी, “माझे स्वतःचे हित, माझ्या कुटुंबाचे हित, माझ्या भाषेचे हित, माझ्या जातीचे हित, माझ्या प्रांताचे हित, माझ्या पंथाचे हित, हे नेहमीच दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला क्रमांकावर हिंदू हित म्हणजे राष्ट्रीय हित आहे,” असे म्हटले आहे.
एकमेकांशी भांडणे टाळा – मोहन भागवत
“एकमेकांमध्ये भांडणे लावणाऱ्या अशा कोणत्याही आम्ही गोष्टीत जाणार नाही. भ्याड वाटेल अशा कोणत्याही गोष्टीत आम्ही जाणार नाही. एकमेकांशी भांडणे टाळा. आपण स्वाभिमानाने जगू आणि विश्वाचे पालनपोषण करू,” असे मोहन भागवत यांनी म्हटले. मोहन भागवत स्वामी रामुनाजाचार्य यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या समतेच्या पुतळ्याशी संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.
“आम्हाला संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण तसे व्हायचे असते तर झाले असते. हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही. ज्यांना आमचा नाश करायचा आहे ते पोकळ होत आहेत. आम्ही असेच आहोत. पाच हजार वर्षे जुना सनातन धर्म आजही तसाच आहे,” असे भागवत म्हणाले.
हैदराबादच्या श्रीरामनगरममधील जीवा कॅम्पसमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची स्थापना करण्यात आली आहे, ज्याची उंची २१६ फूट आहे. त्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ही मूर्ती पंचधातूपासून बनवण्यात आली असून त्यात सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांचा समावेश आहे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी मूर्ती आहे. तसेच बसलेल्या स्थितीत बनवलेली सर्वात उंच मूर्ती आहे.