गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. विशेषत: बांगलादेशमधील सत्तापालटानंतर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, या घटनांचे पडसाद आता भारत-बांगलादेश सामन्यादरम्यानही उमटण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनानंतर हिंदू महासभेने आक्रमक पावित्रा घेतला असून ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या भारत-बांगलादेश सामन्याला विरोध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदू महासभेकडून बंदची हाक

‘द इंडिया एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू महासभा ६ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान बंद पाळणार आहे. या दिवशी नागरिकांनी त्यांची दुकानं उघडू नये, असं आवाहन हिंदू महासभेद्वारे करण्यात आलं आहे. तसेच यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचेही हिंदू महासभेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा – विराट कोहलीचे ‘ड्रॉइंग’ लहान मुलांपेक्षा वाईट आहे का? मांजराचा ‘स्केच’ काढतानाचा VIDEO व्हायरल

यासंदर्भात बोलताना, हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज म्हणाले, मागच्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच हिंदू मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही भारत बांगलादेश सामन्याला विरोध करतो आहे. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थिती ग्वाल्हेरमध्ये हा सामना होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांन दिला. पुढे बोलताना, यासंदर्भात आमच्या बैठकीत एकमताने निर्णय झाला असून या दिवशी आम्ही ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे, असेही ते म्हणाले.

महासभेच्या इशाऱ्यानंतर पोलीस अधिकारी म्हणाले…

दरम्यान, हिंदू महासभेच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. आम्ही भारत-बांगलादेश सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू महासभा ही खूप मोठी संघटना नाही, जी थेट कायदा सुव्यवस्थेला आव्हान देईल, अशी प्रतिक्रिया ग्वाल्हेर शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हिंदू महासभेच्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हिंदू सभेचा इशारा इतका गंभीर नाही. गेल्या महिन्यातही त्यांनी अशाचप्रकारे धमकी दिली होती. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहोत. सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – जय शाह यांच्यानंतर BCCI सचिव कोण? नियुक्ती सोडा, नामांकन प्रक्रियेवरही चर्चा होणार नाही, नेमकं कारण काय?

ग्वाल्हेरमध्ये येत्या ६ ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी-२० सामना होणार आहे. ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल १४ वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय सामना होतो आहे. २०१० मध्ये ग्वाल्हेरमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या स्टेडियमची जवळपास ३० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu mahasabha calls for gwalior bandh on day india bangladesh t20 spb