केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अव्वल ठरलेल्या टीना दाबी आणि अतहर आमिर उल शफी खान यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर हिंदू महासभेने आक्षेप घेतला आहे. अतहर आमिर खानचे टीना दाबीबरोबरील लग्न म्हणजे भारतात सुरू असलेल्या लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचा आरोप हिंदू महासभेचे राष्ट्रीय सचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी केला आहे. कट्टरपंथी मुस्लिमांकडून भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत टीनाच्या आई-वडिलांनी यासंबंधी टीनाला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

यूपीएससी परीक्षेतील ‘टॉपर्स’ एकमेकांच्या प्रेमात

टीना दाबीने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळवला होता. तर अतहर आमिर खान हा द्वितीय आला होता. या दोघांनी नुकताच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे दोघांची प्रेमकहाणी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु हिंदू महासभेला मात्र त्यांच्या प्रेम संबंधास विरोध असल्याचे दिसत आहे. त्यांनी याची तुलना थेट लव्ह जिहादशी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू महासभेचे प्रतिनिधी लवकरच टीना दाबीच्या कुटुंबियांची भेट घेऊन योग्य ते सल्ला देणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. लग्न थांबवणे शक्य नसेल तर अतहर खानने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतरच लग्न केले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे. अतहर खानची घरवापसी व शुद्धी कार्य हिंदू महासभा करेल असे सांगण्यासही शर्मा विसरले नाहीत.

टीना आणि आमिर दिल्लीच्या केंद्रीय मनुष्यबळ खात्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात पहिल्यांदा भेटले होते. काश्मीरमधील एका लहानश्या खेड्यातून आलेल्या आमिर आणि मागास समाजातील टीनाने यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. टीनाने सोशल मिडीयावर आमिरसोबतची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. मात्र, मध्यंतरी यावरून फेसबुकवरील काहीजणांनी टीनावर टीका केली होती. अनेकांनी तिच्या आमिरसोबत असलेल्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. टीना दाबी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे.

Story img Loader