मेट्रो प्रकल्पासाठी तोडण्यात आलेले देऊळ पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखालील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दोन तास वाहतूक रोखून ठेवली. या आंदोलनाची खबर मिळताच सत्तारूढ भाजपचे काही आमदार आपल्या समर्थकांसह त्यामध्ये सहभागी झाले होते. सदर मागणी मान्य न झाल्यास जोरदार आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्का-जाम आंदोलन शांततेत पार पडले, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलिसांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
मंदिर बचाव संघर्ष समितीने या आंदोलनात पुढाकार घेतला होता आणि आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. शहरात जवळपास ८० ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती आणि त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. ज्या ठिकाणी देऊळ होते त्याच ठिकाणी ते पुन्हा बांधावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी समितीचे निमंत्रक बद्रिनारायण चौधरी यांनी केली आहे. विद्यमान सरकारने ७३ मंदिरांचे स्थलांतर केले आहे तर यापूर्वीच्या सरकारने ३४ मंदिरे तोडली आहेत, असेही सांगण्यात आले.