देशभरात विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण निर्माण होत आहे. आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे. हा कुतुबमिनार नसून विष्णू स्तंभ असल्याचा दावा त्यांनी केलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी हा दावा करत कुतुबमिनार येथे हनुमान चालिसाचे वाचन केले. दिल्ली शिवसेनेचे माजी प्रमुख जयभगवान गोयल यांच्या युनायटेड हिंदू फ्रंट या संघटनेने हे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

आंदोलकांनी कुतुबमिनार विष्णू स्तंभ असल्याचा दावा करत या ठिकाणी पुजेची परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी ही वास्तू कुतुबुद्दीने बांधली नसून सम्राट विक्रमादित्य यांनी बांधल्याचाही दावा केलाय. असा दावा करणारे पोस्टर घेत आंदोलक कुतुबमिनार परिसरात जमा झाले होते.

हातात भगवे झेंडे, पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी

आंदोलकांनी यावेळी हातात भगवे झेंडे, पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी कुतुबमिनार विष्णू स्तंभ असल्याचा दावा करणाऱ्या जयभगवान गोयल आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : “मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो, याचा अर्थ…”, राहुल गांधींचं अमेठीमध्ये मोदींवर टीकास्त्र!

दरम्यान, याधी अशाचप्रकारे कुतुबमिनार परिसरात पूर्वी गणेश मंदिर असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेशी संबंधित काही लोकांनी केला होता. त्यावरूनही वाद झाला होता.

Story img Loader