Mosque in Uttarakhand : उत्तराखंडमधील बेरीनाग येथील एका घरात मशिद तयार करण्यात आल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी केला आहे. त्याविरोधात हिंदू संघटनांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही केले. या आंदोलनातून बेकायदेशीर मशीद हटवण्याची मागणी हिंदू संघटनेच्या सदस्यांनी केली होती. अखेर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बेरिनागमधील एका पडक्या घरात बेकायदेशीरपणे मशीद स्थापन करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रीय सेवा या हिंदू संघटनेने ६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. “आम्ही बेकायदेशीर मशीद हटवण्याची मागणी केली आहे. जर ते असेच चालू राहिले तर आम्हाला त्याविरुद्ध देशव्यापी आंदोलन करावे लागेल”, असं संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष हिमांशू जोशी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा >> Delhi Crime News : धक्कादायक! दिल्लीत सिरीयन शरणार्थी आणि त्याच्या तान्ह्या बाळावर अॅसिड हल्ला
पिथौरागढचे जिल्हा दंडाधिकारी विनोद गिरीश गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेने निवेदन दिल्यानंतर या आरोपाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही काळापूर्वी सोशल मीडियावर मशीद लाइव्ह दाखविल्यानंतर राष्ट्रीय सेवा संघटनेच्या सदस्यांविरुद्ध बीएनएस (धर्माच्या आधारावर गटांमधील वैर वाढवणे) कलम १९६/२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्दवानी येथे राहणारे अझीम यांच्या मालकीचे हे जुने घर असून गेल्या २५ वर्षांपासून जवळपास १०० मुस्लिम कुटुंबे येथे नमाज अदा करत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.
प्रशासनाचा दावा काय?
९ सप्टेंबर रोजी, संयुक्त सनातन धर्म रक्षक संघाने उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी मेहरबान सिंग बिश्त यांना निवेदन सादर केले आणि मशीद पाडण्याची मागणी केली. मशीद बिगर नोंदणीकृत जमिनीवर बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु ही मशीद बेकायदेशीर नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.