Hindu outfit Hindu Sangharsh Samiti attack on Bangladesh mission : त्रिपुराची राजधानी आगरताळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या परिसरात आंदोलकांनी धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकाराचे राजनैतिक पडसाद उमटताना दिसत आहेत. ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना पाचारण करून बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतरीत्या या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली.
विशेष बाब म्हणजे बांगलादेशी सरकारने या घटनेसाठी जबाबदार ठरवलेली संघटना ‘हिंदू संघर्ष समिती’ (एचएसएस) ही अवघ्या एका आठवड्यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये हिंदू समाजाचे नेते चिन्मय दास प्रभु यांना अटक झाल्यानंतर देशात बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सुटकेसाठी आंदोलने केली जात आहेत. यादरम्यान हिंदू संघर्ष समिती ही संघटना हिंदू धर्मियांवर होणार्या अत्याचारांविरोधात लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे.
सात जणांना अटक
एचएसएसचे नेते शंकर रॉय यांनी सांगितले की, ‘हिंदू संघर्ष समिती’ ही हिंदुत्ववादी गटांची एक संघटना आहे. तसेच ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांच्यासारखा समविचारी सामाजिक मंच असल्याचेही ते म्हणाले. गेल्या आठवडाभरात देशातील सर्व जिल्ह्यात अशा संघटना स्थापन झाल्याचे देखील त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
दरम्यान बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेनंतर, कथित एचएसएस संघटनेच्या सात सदस्यांना तोडफोड करणे आणि बांगलादेशचा झेंडा खाली उतरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीनावर सोडून देण्यात आले.
त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा नेते तसेच आरएसएसशी संबंधित संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य देखील अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एचएसएसबरोबर संबंध असल्याचे नाकारले नाही. पण त्यांनी बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग नाकारला आहे.
बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निषेध आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते पूर्ण चंद्र मंडल हे उपस्थित होते आणि या ठिकाणी त्यांनी भाषण देखील दिले होते. ते म्हणाले की, “हिंदू संघर्ष समितीची एवढीच मागणी आहे की भारत सरकारने हिंदूंवर होत असलेले हल्ले थांबवण्यासाठी तसेच चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा”.
मंडल यांनी पुढे बोलताना सांगितेल की, सोमवारी हिंदू संघर्ष समिती सहाय्यक उच्चायुक्तांना निवेदन देणार होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना ते म्हणाले की “मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते आणि सहाजिकच प्रत्येकजण एकमेकांना ओळखत नव्हता. मी फक्त माझे भाषण दिले आणि त्यानंतर काय झाले ते मला माहिती नाही”. घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत मंडल पुढे म्हणाले की, “मला वाटतं की बांगलादेशमध्ये होत असलेल्या घटनांबाबत जनतेच्या संतापाचे ते एक प्रतिबिंब आहे”.
बजरंग दल संघटनेचे पश्चिम बंगाल, ओडिसा, सिक्कीम याबरोबरच अंदमान आणि निकोबार बेटे या भागाचे क्षेत्र संयोजक अमोल चक्रवर्ती म्हणाले की, हिंदूंनी एकत्र येण्याची आणि बांगलादेशवर दबाव आणून तेथे पुन्हा लोकशाही आणण्याची वेळ आली आहे.
तर त्रिपुरा भाजपा उपाध्यक्ष सुबल भौमिक म्हणाले की, बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या परिसरात जे झालं ती छोटी गोष्ट आहे . तरीही येथे हिंसाचार टाळता आला असता. ते म्हणाले की जे तरूण सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या परिसरात घुसले त्यांनी कोणालाही इजा पोहचवली नाही. त्यांनी फक्त झेंडा हटवला आणि ते परत आले. बांगलादेशमध्ये तिरंग्याचा वारंवार अपमान केला जात आहे. त्याच्याबद्दल निषेध व्यक्त करण्याएवजी सुरक्षेचा भंग झाल्याचे प्रकरण मोठे करून दाखवले जात आहे, असेही ते म्हणाले.
‘वैदिक ब्राह्मण समाज’, ‘जागो हिंदू जागो’ आणि ‘सनातनी युवा’अशा इतर संघटनांनकडून देखील आगरताळा तसेच बांगलादेशच्या सीमेजवळही निदर्शने केली जात आहे. सनातनी युवा संघटनेच्या आंदोलनामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांचाही समावेशदेखील होता . या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी बांगलादेशमध्ये सध्या रानटीपणा सुरू असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या की, “सनातनी अल्पसंख्यांकांच्या संपत्तीची लूट केली जात आहे, त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे, त्यांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार केला जात आहे… याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे”.
त्रिपुरामधील सीपीआय (एम)चे राज्य सचिव आणि विरोधीपक्ष नेते जितेंद्र चौधरी यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल निषेध व्यक्त केला. तसेच कोणतेही आंदोलन हे लोकशाही मार्गाने झाले पाहिजे असे मतही व्यक्त केले. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की, “फक्त आम्ही एकटेच नाही सर्व लोकशाहीवादी लोक बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचाराचा विरोध करतात. असे असले तरी आपली निदर्शने लोकशाही मार्गाने आणि देशाच्या कायद्यांनुसार तसेच आंतरराष्ट्रीय नियमानुसार असली पाहिजेत.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की बांगलादेशविरोधात होत असलेल्या आंदोलनांमध्ये हिंदू संघर्ष समिती यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवीन संघटनांचा समावेश आहे. या संघटनांकडून ते हिंदू अधिकारांसाठी लढत असल्याचा दावा केला जात आहे आणि या संघटना या आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरण आंदोलनात सहभागी संघटनांप्रमाणेच आहेत.
हेही वाचा>> तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य
अखिल भारतीय हिंदू महासभेकडून बुधवारी पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. हिंदू महासभेचे पश्चिम बंगालचे प्रमुख चंद्रचू़र गोस्वामी म्हणाले की, “जोपर्यंत भारतीय राष्ट्रध्वजाच्या कथित अपमानाबद्दल देश माफी मागत नाही तोपर्यंत भारतीयांनी बांगलादेशी नागरिकांना राहायला जागा देणे किंवा इतर कोणतीही सेवा नाकारली पाहिजे”.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम बंगालमधील एक वरिष्ठ प्रचारक म्हणाले की, “हिंदू एकत्र येत नाहीत आणि याचा गैरफायदा इतर समाजांकडून घेतला जातो. पण सध्या परिस्थिती बदलली आहे आणि प्रत्येक हिंदू व्यक्तीला आपण जाणीव झाली आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या आत्याचाराविरोधात आपण रस्त्यावर उतरले पाहिजे”.
तर या एकंदरीत परिस्थितीवर भाजपाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की, “होय, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू गटांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यातील काहीजण भाजपा किंवा आरएसएसबरोबर असू शकतात. तो काही गुन्हा नाही.”
तर तृणमूल काँग्रेस पक्षाने भाजपा हिंदूंना भडकावून परिस्थितीला धार्मिक वळण देत असल्याचा आरोप केला जात आहे. टीएमसी नेते कुणाल घोष म्हणाले की, “बांगलादेशमध्ये जे काही होत आहे ते स्वीकार केले जाऊ शकत नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी याआधीच केंद्र सरकारला आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. भाजपाकडून येथे मोर्चे का काढले जात आहेत? त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे… भाजपा फक्त मतांसाठी हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे”.