दिल्लीत प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी प्रियकर आफताब पुनावालावर हिंदू सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी (२८ नोव्हेंबर) तलवारीने हल्ला केला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्याचवेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला केल्यानंतर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष कुलदीप ठाकूरने हा हल्ला करण्यामागील कारण सांगत माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
कुलदीप ठाकूर म्हणाला, “जर आमच्या बहिणी आणि मुलीच सुरक्षित नसतील, तर आम्ही जगून काय करू? आम्ही आफताबला मारून टाकू. मी दोन मुलींचा बाप आहे. आम्ही तलवारने हल्लाच काय गोळीही मारू. आम्ही हिंदू सेनेचे सदस्य आहोत. आम्ही एकूण १० लोक आफताबवर हल्ला करण्यासाठी आलो होतो. मी कुलदीप ठाकूर हिंदू सेनेचा राज्याध्यक्ष आहे.”
“दोन मिनिटे गाडीबाहेर काढा, आम्ही त्याला फाडून टाकू”
आरोपींवर कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे, देशात कायदा आहे, तुम्ही कायदा हातात घेणार का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “पोलीस तर आरोपीला सुरक्षा देत आहेत. कायद्याने त्या मुलीला वाचवलं का? हे सर्वांना लक्ष्य करतात. दोन मिनिटे त्याला गाडीबाहेर काढा. आम्ही त्याला फाडून टाकू. त्याने कुणाच्या तरी मुलीला मारलं आहे. त्याने त्या मुलीचे ३५ तुकडे केले आहेत.”
हेही वाचा : Photos : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”
नेमकं काय घडलं?
आफताबची श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी सकाळपासून दिल्लीत पॉलीग्राफी चाचणी सुरू होती. चाचणी झाल्यानंतर आफताबला सायंकाळी पुन्हा तुरुंगात नेण्यात येत होतं. त्याचवेळी तीन-चार जणांनी तलवार घेऊन येत गाडीवर हल्ला चढवला.
व्हिडीओ पाहा :
तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.
पोलिसांनी हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहचू दिलं नाही. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात आफताबला कोणतीही दुखापत झालेली नाही.
हल्ला करणारा आरोपी हल्ला करताना “आम्ही गुरुद्वारातून ही तलवार घेऊन आलो आहे. आफताबला दोन मिनिटे गाडीच्या बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू,” असं बोलतानाही आढळलं. आम्ही बंदुक आणि रायफलही आणू आणि आफताबला मारून टाकू, असंही हे आरोपी बोलताना दिसले.