एका महिलेच्या अंत्यसंस्कारांवेळी तिची दोन मुलं अत्यंविधी कोणत्या धर्मानुसार करावे यावरून भांडल्याची घटना नुकतीच हैदराबादमध्ये घडली आहे. मृत महिलेचा मुलगा जो हिंदू धर्म मानतो तर मुलीने इस्लाम स्वीकारला आहे. मुलाला असं वाटत होतं की त्याच्या आईवर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार व्हायला हवेत, तर मुलीचा हट्ट होता की, तिच्या आईचा मुस्लीम रिवाजांनुसार दफनविधी व्हावा. हे भाऊ आणि बहिणीतलं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर कुठे हे प्रकरण शांत झालं.
खरंतर भाऊ आणि बहीण दोघेही वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतात. परंतु आईच्या अंत्यविधीवरून भाऊ-बहीण भिडले, त्यामुळे हैदराबादच्या मदन्नापेटमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि हे प्रकरण मिटवलं.
ही घटना मदन्नापेटमधील दराब जंग कॉलोनीतली आहे. येथील एका ९५ वर्षीय महिलेचं नुकतंच निधन झालं आहे. त्यानंतर तिचा मुलगा हिंदू पद्धतींनुसार अंत्यविधी करणार होता. कारण त्याची आईदेखील हिंदू होती. तर मृत महिलेची मुलगी जिने २० वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, ती मात्र हट्टाला पेटली. तिचं म्हणणं होतं की, अंत्यविधी हे इस्लामिक पद्धतीनेच झाले पाहिजेत.
मृत महिलेची मुलगी म्हणाली, मी गेल्या १२ वर्षांपासून आईची काळजी घेत आहे. या मुलीने दावा केला आहे की, तिच्या आईनेदेखील मुस्लीम धर्म स्वीकारला होता. अलिकडेच आईवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली त्यासाठी पाच लाख रुपये खर्च केले होते. आईची शेवटची इच्छा होती की तिचा मृतदेह दफन केला जावा.
हे ही वाचा >> आयएएस बनण्यासाठी सोडली १४ लाखांची नोकरी, दोनदा नापास, तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी, पण आता म्हणतो…
पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, पोलिसांनी ही परिस्थिती नीट हाताळली, कुठेही तणाव निर्माण होऊ दिला नाही. हे एक कौटुंबिक भांडण होतं. पोलिसांनी ते शांततेनं मिटवलं. मुलीच्या इच्छेनुसार तिथे इस्लामिक पद्धतीने अंतिम प्रार्थना करण्यात आली. त्यासाठी मुलगी मृतदेह घेऊन गेली होती. त्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात देण्यात आला. मुलाने हिंदू परंपरेनुसार अत्यंसंस्कार केले. हे प्रकरण पोलिसांनी मिटवलं आहे. तसेच भाऊ आणि बहिणीचं भांडणही आता मिटलं आहे.