पाकिस्तानात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या कठिण काळात बलुचिस्तानातील हिंदू समाजाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्तांना निवारा देण्यासाठी कच्छी जिल्ह्यातील जलाल खान या गावातील बाबा मधूदास मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानातील पुराचा ८० जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत १२०० जणांनी आपला जीव गमावला आहे. ‘यूनायटेड नेशन्स पोप्युलेशन फंड’(UNFPA) या संस्थेने पूरग्रस्त भागातील ६ लाख ५० हजार गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा पोहोचवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या महिलांना सुरक्षित बाळंतपणासाठी तात्काळ मदतीची गरज असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध
विक्रमी पाऊस आणि पुरामुळे पाकिस्तानातील ३३ दशलक्ष लोकांना फटका बसला आहे. यामुळे पूरग्रस्त भागात विविध आजार बळावले आहेत. पाकिस्तानातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला असून नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या पुरामुळे पाकिस्तानातील शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे. २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षामध्ये पाकिस्तानातील कृषी क्षेत्राचा विकासदर शून्य टक्के राहण्याची शक्यता आहे. या पुरामुळे पाकिस्तानात ३० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.