Attack on Hindu in Canada: रविवारी कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागात एका हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद कॅनडासह आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास कॅनडातील हिंदू सभा मंदिर परिसरात ही घटना घडली. एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व इतर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत असताना दुसरीकडे अमेरिकेतून थेट कॅनडा सरकारवरच या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात अमेरिकेतील भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी परखड भाष्य केलं आहे.
नेमकं काय घडलंय कॅनडामध्ये?
कॅनडातील हिंदू सभा मंदिरात रविवारी काही हिंदू भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार हिंदू भाविकांकडून करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरातच तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये काहीजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेनं ‘आम्ही मंदिर परिसरात भारतीय उच्चायुक्त दर्शनासाठी येण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होतो’, असं म्हणत हल्ला केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
या घटनेच्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडिओमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसत आहे. एकीकडे खलिस्तानवादी आंदोलक दिसत असून दुसरीकडे भारतीय ध्वज हातात घेतलेला गट दिसत आहे. या गटांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवल्यानंतर मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा कॅनडाचे पंतप्रदान जस्टिन ट्रुडो, विरोधी पक्षनेते पिएर्रे पोलिव्हरे व एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी निषेध केला आहे. पण दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नसून एकही गुन्हा दाखल केलेला नाही.
Attack on Hindu in Canada: कॅनडात हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; पंतप्रधान ट्रुडोंचा निषेध!
श्री ठाणेदार यांचा कॅनडावर संताप!
दरम्यान, या घटनेचा निषेध करत अमेरिकी संसदेचे सदस्य श्री ठाणेदार यांनी कॅनडावर संताप व्यक्त केला आहे. “मी अमेरिकेत हिंदू संघटेनीच स्थापना केली आहे. अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत मी अमेरिकेच्या गृह विभागाशी असंख्यवेळा बोललो आहे. आता कॅनडातील सरकार या प्रकारावर राजकारण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ते कॅनडातील काही अल्पसंख्याक गटांचं लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशा शब्दांत श्री ठाणेदार यांनी निषेध व्यक्त केला आहे.
“कॅनडात हिंदूंवर झालेला हल्ला ही एक दहशतवादी कृती असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांना कॅनडा सरकारकडून दिल्या जाणाऱ्या संरक्षणाचा निषेध केला जायला हवा. कॅनडा सरकारच्या या वर्तनाचा विरोध व्हायला हवा. बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यकांप्रमाणेच कॅनडातील हिंदू अल्पसंख्यकांनादेखील मूलभूत मानवी अधिकार आहेत. त्यांचं संरक्षण व्हायला हवं. मी या प्रकारांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अल्पसंख्याक, मग ते बांगलादेशमधील असोत किंवा अमेरिका वा कॅनडातील असोत, त्यांच्याविरोधात होणाऱ्या या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेण्यासाठी अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्याचा मी वारंवार प्रयत्न केला आहे”, असंही ठाणेदार म्हणाले.