मागील काही दिवसांपासून कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून सातत्याने मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. सोमवारी एडमंटनमध्ये पुन्हा एका मंदिराची तोडफोड करत विटंबना करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या भिंतीवर भित्तिचित्रे काढत विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनंतर कॅनडातील हिंदू धर्मियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कॅनडातील विश्वहिंदू परिषदेने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कॅनडाच्या एडमंटनमधील स्वामानारायण मंदिरात खालिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेचा निषेध करत कॅनडा सरकारकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा – कॅनडातील राम मंदिराची तोडफोड, भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, वर्षभरातली चौथी घटना
महत्त्वाचे म्हणजे खालिस्तानी समर्थकांकडून मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा कॅनडातील मंदिरांची तोडफोड केली आहे. गेल्यावर्षी मिसिसोंगा येथील राम मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेचा निषेध नोंदवला होता. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
याशिवाय जानेवारीमध्ये, ब्रॅम्प्टन येथील एका मंदिराची विटंबना करण्यात आली होती. या मंदिराच्या भींतींवर भारतविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. ज्यामुळे भारतीय समुदायामध्ये संताप निर्माण झाला होता. तसेच सप्टेंबरमध्ये, BAPS स्वामीनारायण मंदिर, टोरंटोची कॅनडियन खलिस्तानी अतिरेक्यांनी विटंबना केली होती.