पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर भारतीय नेत्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी परराष्ट्र मंत्र्यांना हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी सोमवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पाकिस्तानी न्यूज नेटवर्क समा टीव्हीनुसार, आरोपींनी संध्याकाळी कराचीच्या रणछोड लाइन भागातील एका हिंदू मंदिरात प्रवेश केला आणि नंतर हातोड्याने मूर्तीचे नुकसान केले.

मंदिराच्या तोडफोडीचे वृत्त समजताच लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकांनी घटनास्थळीच आरोपीला पकडले. त्यानंतर आरोपींला लोकांनी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीवर ईशनिंदा संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना अल्पसंख्याकांविरुद्ध राज्य समर्थित दहशतवादी कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. सिरसा यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, “पाकिस्तानमधील कराची येथील रणछोड लाईन येथे आणखी एका हिंदू मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. तर मंदिर प्रार्थनास्थळ होण्यास पात्र नाही, असे सांगून हल्लेखोरांनी तोडफोडीचे समर्थन केले. हे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंविरुद्ध राज्य-समर्थित दहशतवादी कृत्य आहे,” असं ते म्हणाले.

दुसर्‍या ट्विटमध्ये, सिरसा यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीमेपलीकडील हिंदू आणि शीखांच्या धर्म स्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी जागतिक स्तरावर हा मुद्दा उचलण्याची मागणी केली.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड केल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्येही अज्ञात हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील मंदिराची तोडफोड केली होती. तेथून त्यांनी हजारो रुपयांचे दागिने आणि रोकडही पळवून नेली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu temple vandalised in karachi pakistan accused arrested bjp leader manjinder singh sirsa tweet hrc
Show comments