लंडनच्या लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराची घटना समोर आली आहे. या घटनेचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उच्चायुक्तांनी केली आहे. पूर्व लीसेस्टरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने मंदिराची तोडफोड केल्यानंतर भगवा ध्वज काढून टाकला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या ४७ जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती लीसेस्टर पोलिसांनी दिली आहे.
ब्रिटनच्या लीसेस्टर शहरात भारतीयांवर हल्ले ; भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे पडसाद
काळे कपडे परिधान केलेल्या अज्ञाताने पोलिसांच्या उपस्थितीत हे कृत्य केले आहे. २८ ऑगस्टला ‘आशिया चषक’ स्पर्धेत दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर लीसेस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लीम गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. यानंतर ही घटना समोर आली आहे. मंदिरातील ध्वज खाली उतरवण्यात आल्याच्या घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या परिसरातील हिंदू कुटुंबीयांची घरे आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘जय श्री राम’ घोषणाबाजी करणाऱ्या एका गटाने मुस्लीम व्यक्तींच्या मालमत्तेची तोडफोड केल्याचा दावा लीसेस्टर पोलिसांनी फेटाळला आहे.
दरम्यान, हिंसाचार आणि नुकसानीच्या अनेक घटनांची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भारतीय उच्चायुक्तांनी एका निवेदनातून भारतीय समाज आणि हिंदू प्रतिकांविरोधात हिंसाचार झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेतील पीडितांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी उच्चायुक्तांनी लंडन प्रशासनाला केली आहे.