हिंदू धर्मातील मूल्यांचे पुनरावलोकन होणे गरजेचे असून, विज्ञानाच्या कसोटीवर टिकू न शकणाऱ्या मूल्यांचा हिंदूंनी त्याग केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्तंभलेखक परिषदेत बोलत होते. यावेळी ‘महिलांकडे बघण्याचा भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना भागवतांनी हे वक्तव्य केले. प्रचलित हिंदू धर्माचे शास्त्रीय कसोटीनुसार मूल्यांकन होणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या मूल्यांना शास्त्रीय आधार नसल्याचे सिद्ध होईल, अशा मूल्यांचा त्याग केला पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले. अनावश्यक परंपरांचा त्याग करून विश्वातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याच्या शाश्वत मुल्यांवर हिंदू धर्म आधारित आहे. त्यामुळे जीवनातील सर्व समस्यांकडे हिंदू तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. हिंदू विचारधारेनुसार पुरूष आणि स्त्री या एकाच घटकाच्या दोन अभिव्यक्ती आहेत. त्यामुळे हिंदू विचारधारा समानतेऐवजी एकतेवर भर देते, असा विचार भागवतांनी यावेळी मांडला.
याशिवाय उपस्थितांना भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी असंख्य आव्हानांचा मुकाबला करून ही व्यवस्था टिकून असल्याचे सांगितले. आपलं हेच मूळ समजून घेऊन ते मजबूत केल्यास पाश्चात्य व अन्य हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करता येईल, असेही त्यांनी म्हटले. याशिवाय, केवळ हिंदू धर्मातच जगाला संतुलित पद्धतीने पुढे नेण्याची क्षमता असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.