मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या नवजात बाळाला इस्लामिक धर्मावर आधारित नाव देणार नसल्याचे सांगताच हिंदू सूनेला सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केली. तसेच पतीने तिला मित्रांकरवी बलात्कार आणि हत्या करण्याचीही भीती दाखवली. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आता पती शाहीद अहमद ऊर्फ राज, सासू शबनम, नणंद सानिया आणि त्यांचे नातेवाईक वसीम अख्तर, नौमन आणि फैजल खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाणीचा आरोप केल्यामुळे पोलिसांनी पीडित महिलेची मंगळवारी वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले. दैनिक भास्कर वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, सदर प्रकरणातील पीडित महिला आणि तिचा पती शाहीद हे दोघे २०१९ साली एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करत होते. त्यावेळी शाहीदने त्याचे नाव राज असल्याचे सांगितले. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

“शिक्षणापेक्षा मुस्लिमांना हिजाब किंवा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे”, अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचं परखड भाष्य!

दरम्यान पीडितेने राजच्या घरी भेट दिली असता तो मुस्लीम असून त्याचे नाव शाहीद असल्याचे तिला कळले. आपण आंतरधर्मीय असल्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही, असे पीडित महिलेने स्पष्ट केले. मात्र आपण लवकरच हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचे वचन दिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्व सुरळीत होते. मात्र पीडित महिलेने मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांच्यात वाद उद्भवला. आईला हिंदूंमध्ये प्रचलित असलेले नाव बाळाला द्यायचे आहे. तर सासरच्यांना मुस्लीम धर्मीय नाव द्यायचे आहे. सासरच्यांकडून बळजबरी होऊ लागल्यानंतर पीडितेने शाहीदला त्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. माझ्यावर आणि माझ्या मुलांवर धर्म थोपविला जाणार नाही, या आश्वासनाचे काय झाले? पीडितेच्या या प्रश्नानंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. तिला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली.

“माझ्यात मोदींप्रमाणे दैवीशक्ती…”, राहुल गांधींची टीका; वायनाड की रायबरेली? यावरही दिले उत्तर

आपण सासरच्या मंडळींचे ऐकले नाही तर मला आणि माझ्या मुलाला मारून टाकतील, अशी धमकी दिली असल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. तसेच मुलाला मारून टाकण्याची धमकी देत शाहीदने त्याच्या मित्रांकरवी माझ्यावर बलात्कार करण्याचीही धमकी दिली असल्याचा आरोप पीडितेने केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, नणंद आणि सासूला अटक केली. आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली.