पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. इतकंच नाही तर तिचे स्तनही कापून टाकण्यात आले असल्याची माहिती कृष्णा कुमारी यांनी दिली आहे. कृष्णा कुमारी या पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत.
पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णा कुमारी यांनी पीडित महिलेच्या शरीर आणि चेहऱ्यावरील कातडीही सोलून काढण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. पीडित महिलेला चार मुलं आहेत.
कृष्णा कुमार यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार “४० वर्षीय विधवा दया यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, वाईट अवस्थेत मृतदेह आढळला. तिचे शीर वेगळे करण्यात आले होते आणि रानटी लोकांनी संपूर्ण डोक्याचे मांस काढून टाकले होते. मी तिच्या गावाला भेट दिली. पोलिसांची पथकही पोहोचली आहेत”.
पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्याने बुधवारी शेतात मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली आहे. तसंच पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाकडून माहिती गोळी केलं असल्याचं म्हटलं आहे. शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास सुरु असल्याचंही या नेत्याने सांगितलं आहे.