इंडोनेशियाला मागे टाकून २०५० साली भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश ठरेल, तसेच त्यावेळेपर्यंत हिंदूंची लोकसंख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची राहील, असे अमेरिकेच्या एका ‘थिंक-टँक’च्या अभ्यासात आढळले आहे.
जगातील एकूण लोकसंख्यावाढीचा जो दर आहे, त्यापेक्षा मुसलमानांची संख्या अधिक वेगाने वाढेल, तर हिंदू व ख्रिश्चन यांची वाढ साधारणत: जागतिक लोकसंख्या वाढीच्या दराइतकीच राहील, असे अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरच्या धार्मिक रूपरेषा अंदाजाच्या आकडेवारीत नमूद केले आहे.
भारत हा हिंदू बहुसंख्याक असलेला देश राहील, परंतु इंडोनेशियाला मागे टाकून जगातील कुठल्याही देशापेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या भारतात असेल. २०११ साली इंडोनेशियातील मुस्लीम लोकसंख्या २०५ दशलक्ष होती, तर भारतात १७७ दशलक्ष मुस्लीम राहात होते. आगामी चार दशकांमध्ये ख्रिस्ती धर्म हाच जगातील सर्वात मोठा धार्मिक गट राहील, परंतु कुठल्याही इतर धर्मापेक्षा इस्लामची वाढ अधिक वेगाने होईल, असे या अहवालात म्हटले आहे.
२०५० साली जगातील मुस्लीम (२.८ अब्ज किंवा लोकसंख्येच्या ३० टक्के) आणि ख्रिश्चन (२.९ अब्ज किंवा ३१ टक्के) यांची संख्या जवळजवळ सारखी राहील आणि बहुधा इतिहासात असे पहिल्यांदाच घडेल.
२०१० सालात युरोपच्या लोकसंख्येच्या ५.९ टक्के इतके असलेले मुस्लिमांचे प्रमाण २०५० पर्यंत सुमारे १० टक्के होईल. सध्या १ अब्जाहून थोडी अधिक असलेली जगभरातील हिंदूंची संख्या २०५० पर्यंत ३४ टक्क्य़ांनी वाढून १.४ अब्ज होईल. त्या वेळेपर्यंत हिंदू जगात तिसऱ्या क्रमांकावर राहतील व एकूण लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण १४.९ टक्के राहील. याखालोखाल, कुठल्याही धर्माशी संबंधित नसलेल्यांची संख्या १३.२ टक्के इतकी असेल. सध्या अशा लोकांचा जगात तिसऱ्या क्रमांकावरील वाटा आहे.
याच कालावधीत, युरोपमधील हिंदूंची संख्या वाढून जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने स्थलांतराचा परिणाम म्हणून युरोपातील हिंदूंची सध्याची १.४ अब्ज (युरोपच्या लोकसंख्येच्या ०.२ टक्के) ही संख्या वाढून २.७ अब्ज (०.४ टक्के) इतकी होण्याचा अंदाज अहवालाने वर्तवला आहे. उत्तर अमेरिकेत स्थलांतराचा मुद्दा विचारात घेता हिंदू लोकसंख्येचे प्रमाण २०१० सालातील ०.७ टक्क्य़ांवरून २०५० साली १.३ टक्क्य़ांपर्यंत पोहचेल, अन्यथा ते सध्याइतकेच राहील, असेही अहवालात नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा