शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वीच मंदिर अपूर्ण आहे, तिथे प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसंच २२ जानेवारी हा कुठलाही मुहूर्त नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. अशात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २१ जानेवारीला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. आम्ही पंतप्रधान मोदींचे विरोधक नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हाला सोहळ्याचं निमंत्रण नाही आणि ते आलं तरीही आम्ही जाणार नाही असंही अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते. आता मात्र त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद?
“मी याआधीही हे म्हटलं आहे, आज पुन्हा सांगतो. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यापासून हिंदू समाजाचा स्वाभिमान जागा झाला आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केलेली नाही. राम मंदिर उभारणीसाठी आम्ही त्यांचं कौतुकच करतो आहोत. तसंच आम्ही मोदी विरोधी नाही हे समजून घ्या.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्याने हिंदू समाजाचा स्वाभिमान जागा झाला आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही मोदींच्या विरोधात नाही. आम्हाला त्यांचं कौतुक वाटतं. भारतात पंतप्रधान मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत जे हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणारा आहे. हिंदूंना काय वाटतं? त्यांच्या भावना काय आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाऊक आहे.”
काही दिवसांपूर्वीच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराविषयी मोठं वक्तव्य केलं होतं. अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राण प्रतिष्ठा सोहळा पुढे ढकलावा. आत्ता होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा धर्मशास्त्राला धरुन नाही असं शंकराचार्य म्हणाले होते. तसंच २२ जानेवारी हा कुठलाही मुहूर्त नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.