देशाला अधिकाधिक शक्तिशाली बनविण्यासाठी हिंदूंनी आपापसामधील मतभेद दूर ठेवून एकत्र यावे, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
देशासाठी सर्व हिंदू एकत्र येतील तेव्हाच भारत अधिक शक्तिशाली बनेल. भारताला यापूर्वी जगाचा गुरू म्हणून संबोधले जात होते आणि यापुढेही त्याचप्रमाणे संबोधले जाईल, असेही भागवत म्हणाले. नर्मदा नदीच्या तीरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महेश्वर हिंदू संगम’मध्ये ते बोलत होते.
अमेरिकेकडे पैसा आणि व्यापारी ताकद आहे, चीनकडे लष्करी सामथ्र्य आहे, परंतु भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की त्याच्याकडे सर्व सामथ्र्य आहे. देशात विविधता आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, जगण्याची पद्धतही वेगवेगळी आहे; परंतु समाजाची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या कल्याणासाठी हिंदू सदैव खंबीरपणे उभा राहिला आहे, असेही भागवत म्हणाले.
संघटनेच्या नेत्यांशी चर्चा
मोहन भागवत हे रविवारपासून तीन दिवस संघपरिवार आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या अन्य संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून भविष्यातील रणनीती ठरविणार आहेत. येत्या १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान भागवत संघटनेच्या नेत्यांसमवेतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मजदूर संघ या संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे संघाचे प्रादेशिक सचिव बिहारी मिश्रा यांनी सांगितले.
साकेतनगर येथील रेल्वे स्टेडियमवर भागवत संघाच्या २० हजार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.