बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) हादरा बसला आहे. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी ‘एनडीए’ला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय जनता दल- काँग्रेस यांच्या महाआघाडीत सामील झाले आहेत. मांझी हे आमचे जुने मित्र असल्याचे सांगत राजदने मांझी यांचे महाआघाडीत स्वागत केले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जद(यू) आणि राजद आघाडीला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झाल्यावर जितनराम मांझी यांनी ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ या पक्षाची स्थापना केली. नितीशकुमार हे आपल्या पक्षाचे एक क्रमांकाचे शत्रू आसतील, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता बिहारमधील राजकीय समीकरणे बदलली असून नितीशकुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. नितीशकुमार आल्यापासून मांझींकडे भाजपाचे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मांझी समर्थकांकडून केला जात होता. मांझी यांनी भाजपाकडे राज्यसभेतील एका जागेची मागणी केली. राज्यसभेत स्थान दिले नाही तर पोटनिवडणुकीतील प्रचारात सामील होणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली होती.
बुधवारी जितनराम मांझी यांनी राजद नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यादव यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर मांझी यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेस- राजद महाआघाडीत सामील होत असल्याचे जाहीर केले. ‘माझी हे आमच्या कुटुंबाचे जुने मित्र आहेत’, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
Former CM Jitan Ram Manjhi quits NDA, joins #Bihar's 'grand-alliance', addressing the media along with Manjhi, RJD's Tejashwi Yadav said, 'he has been an old friend to my parents, we welcome him.' pic.twitter.com/EfghzUQ3WX
— ANI (@ANI) February 28, 2018
२०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीतही लालूप्रसाद यादव यांनी जितनराम मांझी यांना भाजपाविरोधी लढ्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. मांझींना महाआघाडीत घेण्यासाठी लालूंचे प्रयत्न सुरु होते. मात्र, नितीशकुमार व समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी मांझींना विरोध दर्शवला होता.
दरम्यान, एनडीएतून बाहेर पडणारा मांझी यांचा दुसरा पक्ष आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर करत शिवसेनेने भाजपला धक्का दिला होता. तर आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील भाजपावर नाराज आहेत.