वृत्तसंस्था, कोलकाता
हिंदूस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांना कोलकात्यामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. गायिका उषा उत्थुप, शास्त्रीय गायक पंडित अजॉय चक्रवर्ती, त्यांच्या कन्या व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती आणि हजारो चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
समीक्षकांची पसंती आणि चाहत्यांचे अपार प्रेम लाभलेल्या या कलाकाराला राज्य सरकारतर्फे २१ बंदुकांची सलामी देण्यात आली. रवींद्र सदन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे अखेरचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली. त्यांचा देह पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या शवपेटीत ठेवण्यात आला होता.राशिदभाई मला लहान भावासारखे होते, ते फार लवकर आपल्याला सोडून गेले अशी प्रतिक्रिया उषा उत्थुप यांनी व्यक्त केली.